एमआयडीसीतील नमकीनच्या कंपनीला आग

0

जळगाव । दि. 6 । प्रतिनिधी-एमआयडीसीतील एफ सेक्टर मध्ये असलेल्या नमकीन(चिवडा) कंपनीच्या बॉयलर प्लॅन्टमध्ये तेलगळती झाल्याने कंपनीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. 5 टँकर, दोन बंब, तब्बल दिड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसीतील एफ-7 सेक्टरमध्ये उमेशकुमार साहित्या रा. गणपती नगर यांच्या मालकीची श्री गणेश प्रोसेसर नावाने मामा नमकीन (चिवडा) बनविण्याची कंपनी आहे.

या कंपनीच्या बॉयलर प्लॅन्टमध्ये तेलगळती झाल्याने दुपारी अचानक कंपनीला आग लागली. यावेळी बॉयलर प्लॅन्टमध्ये एकही कर्मचारी नव्हते.

बाजुच्या वरद पॉलीमर कंपनीतील कर्मचार्‍यांना शेजारील कंपनीत आग लागल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्याठिकाणी जावून कंपनीतील कर्मचार्‍यांना माहिती दिली.

काही वेेळेतच आगीने रौद्ररुप धारण केले.या आगीत बॉयलर प्लॅन्टचे पत्राचे शेडचे नुकसान झाले असून फॉऊंडेशन सिस्टीम जळून खाक झाली आहे.

दरम्यान कंपनीतील कर्मचार्‍यांनी आगीबाबत मालक उमेशकुमार यांना महिती दिली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, पीएसआय रोहन खंडागळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दिवाळीसाठी भरला होता माल
दिवाळीसाठी कंपनीचे मालक उमेशकुमार साहित्या यांनी कंपनीच्या बॉयलर प्लॅन्टमध्ये तेलाच्या मालाचा भरणा केला होता. दरम्यान दिवाळीसाठी नमकीन बनविण्याचे काम कंपनीत सुरु झाले होते. कंपनीच्या दुसर्‍या प्लॉन्टमध्ये तया झालेला माल पँकींग करण्याचे काम सुरु होते. याचवेळी ही घटना घडली. दरम्यान कंपनीतील महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने तयार झालेला माल तात्काळ बाहेर काढण्यात आल्याने जवळपास 40-50 हजार रुपयांचे नुकसान टळले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

एकदिवस अगोदरच बॉयलर प्लॅन्टमध्ये तेल भरणा
श्री गणेश प्रोसेसर या नमकीन कंपनीच्या एका बाजुला बॉयलर प्लॅन्ट आहे. दि.5 रोजी कंपनीच्या बॉयलर प्लॅन्टमध्ये 30 टन तेल भरणा करण्यात आला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याठिकाणी तेलगळती झाल्यानेच आग लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले. याठिकाणी तेल गळती झाल्यानेच आगीने रौद्ररुप धारण केले.

5 टँकर, 2 बंब व वरुण रथाच्या मदतीने आगीवर नियंत्रण
कंपनीतील बॉयलर प्लॅन्टला आग लागल्याचे कळताच मनपाच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब, खाजगी 5 टँकर व जैन इरिगेशनच्या वरुण रथाच्या फोम सिस्टीममुळे आगीवर तब्बल दिडतासांनतर नियंत्रण मिळविण्यात आले.

मदतीसाठी सरसावले कर्मचारी
श्री गणेश प्रोसेसर कंपनीला आग लागल्याचे कळताच गितांजली केमिकल्स, मेरिको, वैष्णवी व बॅन्जो केमिकल्स या कंपनीतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्यासाठी मदत केली. सुरुवातीला मेरिको कंपनीचे सेफ्टी अधिकारी सदाशिव बोराडे, सेक्युरिटी ऑफीसर आर.एस.पाटील, एचआर विभागाचे गिरीष शिंदे यांच्यासह पथक आग विझविण्याच्या साहित्यासह सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाले होते. याचवेळी गितांजली केमिकल्स कंपनीतील लक्ष्मण राजेंद्र पाटील या तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत फायर सिस्टीम घेवून उडी घेवून शर्थीचे प्रयत्न केले.

40 मिनीट उशिराने पोहचले अग्निशमन विभागाचे बंब
आगीची माहिती कर्मचार्‍यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळविली. घटनास्थळापासून मनपाच्या एमआयडीसी विभागाचे कार्यालय जवळच असतांना देखील तब्बल 40 मिनीट उशिराने मनपाचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

 

LEAVE A REPLY

*