पर्यटकांसाठी निवास व्यवस्था – ना.रावल

0

दोंडाईचा । दि.6 । प्रतिनिधी-पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यांमध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण 200 किल्ल्यांमध्येे पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे.

केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था, कंपन्या यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये पर्यटकांना सवलत
पर्यटन पर्वाच्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टस्मध्ये राहणार्‍या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी एमटीडीसीच्या अधिकार्‍यांना केली. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पारंपारीक पर्यटनाबरोबरच हेरीटेज टुरिजम, ग्री टुरीजम, क्रुझ टुरीजम, माईन टुरीझम, कॅराव्हान टुरिजम, वेलनेस टुरीजम, बॉलीवूड टुरीजम, वाईल्डलाईम टुरीजम अशा विविध नवनवीन पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात या सर्वच पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे. पर्यटन पर्व काळात पर्यटनाच्या या नवीन क्षेत्रांना उजाळा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेरीटेज टुरीजमला मोठा वाव
मुंबईत नुकतेच हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील ऐतिहासिक इमारती, किल्ले, राजवाडे यांची माहिती जाणून घेण्यात देश-विदेशातील पर्यटकांना मोठा रस आहे. त्यासाठी हेरीटेज टुरिजमला चालना देण्याच्या दृष्टीने एमटीडीसीमार्फत यापुढील काळात व्यापक प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील महत्वाच्या 200 किल्ल्यांमध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष तिथे राहून माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने या किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था उभी करण्याबाबत केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून नियोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले.

एमटीडीसीमार्फत पर्यटन पर्वाच्या काळात राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा, माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, प्रवासातील अनुभव शेअर करण्याबाबतची कार्यशाळा, चित्रकला-हस्तकला प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटन पर्व शुभारंभप्रसंगी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्यासह जीव्हीके, जेट एअरवेज, एतिहाद, ओला, कॉक्स अँड किंग्ज, कोस्टा क्रुजेस, एअर बी अँड बी आदी विविध प्रवासी तथा पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*