उपोषणस्थळी आ.डॉ.सतीश पाटील यांची आ.खडसे, सुरेशदादांनी घेतली भेट

0
जळगाव |  प्रतिनिधी :  गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहे.
उपोषणस्थळी आज सकाळी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे व सायंकाळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भेट घेतली. दरम्यान दुसर्‍या दिवशी देखील पाण्याबाबत तोडगा निघाला नसल्याने रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरु होते.

पारोळा व एरंडोल तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या असल्याने याबाबत जिल्हा प्रशासनाला आ.डॉ. सतिष पाटील यांनी वेळोवेळी निवेदन दिले.

तरी देखील पाण्याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसपासून राष्ट्रवादीचे एकमेव आ.डॉ. सतिष पाटील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहे.

आ.खडसे यांनी डॉ.सतिष पाटील यांची भेट घेवून गिरणेचे पाणी बोरी व अंजनी नदीत सोडल्यास शेतकर्‍यांचा फायदा होईल. पाण्याचे समान वाटप करावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे आ. खडसे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मागण्याबाबत डॉ. पाटील यांची भेट घेवून निवेदन सादर करावे असे सांगितले.

माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचा उपोषणाला पाठींबा

उपोषणस्थळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी भेट देवून उपोषणाला पाठींबा दिला. दरम्यान पाणी प्रश्‍नाबाबत जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी डॉ.पाटील यांना दिले.

उपोषणाला पाठींबा म्हूणन उद्यापासून तालुकाभरात आंदोलन

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. सतिष पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून उद्या दि.७ पासून जिल्हयात तालुकाभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष ललीत बागुल यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

*