पाण्यासाठी आ.डॉ.सतीश पाटील यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

0

जळगाव |  प्रतिनिधी : एरंडोल व पारोळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण आहे. जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊनही एरंडोल, पारोळा विधानसभा मतदार संघाला सापत्न वागणूक दिली जात आहे.

गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  बेमुदत उपोषण पुकारले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी आज सकाळी ११ वाजेपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समन्वयक विकास पवार, जिल्हा परीषद सदस्या स्नेहा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी खा.ऍड.वसंतराव मोरे, विश्‍वासराव भोसले, दिलीप पवार, कल्पिता पाटील, उमेश नेमाडे, बाबुलाल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, माजी शहराध्यक्षा मिनल पाटील, महिला शहराध्यक्षा निला चौधरी, ओबीसी सेलच्या सविता बोरसे, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, वकील आघाडीचे ऍड. सचिन पाटील, किसान सेलचे सोपान पाटील, सुदाम पाटील, जि.प. सदस्य रोहन पवार, राजेंद्र देसले, जि.प. गटनेते रविंद्र पाटील, आबा कापसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची मध्यस्थी

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आ. डॉ. सतिष पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आ. डॉ. सतिष पाटील यांनी घेतला.

दरम्यान जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेनुसार आरडीसी राहुल मुंडके यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्याशी आ. डॉ. सतिष पाटील यांचा संवाद घडवुन आणला.

आ.किशोरआप्पांचीही भेट

शिवसेनेचे आ.किशोर पाटील यांनी देखील आज उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतिष पाटील यांची भेट घेवून उपोषणाला पाठींबा दर्शविला.

अशी आहे मागणी

अंजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अंजनी धरण यावर्षी कोरडे असल्याने एरंडोल तालुक्यात भीषण पाणी टंचाई भेडसावणार आहे. अंजनी धरणात पाणी आणण्यासाठी जामदा कालव्यातून व्यवस्था आहे.

जिल्हा प्रशासनाने अंजनी धरण गिरणेच्या पाण्याद्वारे रिचार्ज केले तर एरंडोल तालुक्याची समस्या मिटेल. पिण्याच्या पाण्यासाठीच आग्रही असून या अगोदरदेखील निवेदने दिली गेली. तत्काळ या समस्येकडे लक्ष घालून गिरणेचे पाणी अंजनी धरणात सोडावे.

बोरी धरणावर पारोळा तालुका मोठ्या प्रमाणात अवलंबून असून गिरणेचे पाणी बोरीत सोडण्याची व्यवस्था नदी जोड प्रकल्पाद्वारे केलेली आहे. त्यामुळे बोरी धरणदेखील रिचार्ज करुन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

गिरणाधरणातून बोरी व अंजनी धरणात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना अनेकवेळा निवेदन दिले. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. जोपर्यंत आवर्तन सोडले जाणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवले जाईल.
– आ.डॉ.सतिष पाटील,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

LEAVE A REPLY

*