तुम्हाला जे करायचे ते करा..तुमचे मार्ग मोकळे आहेत… जिल्हाधिकार्‍यांचा भुसंपादनाचा मोबदला मागणार्‍या शेतकर्‍यांना सल्ला

0
जळगाव |  प्रतिनिधी :  तुम्हाला जे करायचे ते करा…तुमचे मार्ग मोकळे आहेत अशा शब्दात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भुसंपादनाचा मोबदला मागायला गेलेल्या पारोळा तालुक्यातील शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणुक दिली.

दरम्यान जिल्हाधिकार्‍यांच्या या वर्तनामुळे शेतकर्‍यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भुमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला.

सन २००७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी नदीजोड प्रकल्पासाठी पारोळा तालुक्यातील भोंडण, पोपटनगर आणि शिरसमणी या गावांमधील ९६ शेतकर्‍यांची जमिन कुठलीही पुर्वसुचना न देता ताब्यात घेतली. या जमिनीपोटी शेतकर्‍यांनी मोबदल्याची मागणी केली. गेल्या १० वर्षापासुन या तीनही गावातील शेतकरी मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या घालत आहे. मात्र ढिम्म असलेल्या जिल्हा प्रशासनाकडुन त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

दंगा नियंत्रण पथकाला पाचारण

पारोळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दंगा नियंत्रण पथकासह डिवायएसपी सचिन सांगळे, पोनि सुनिल कुर्‍हाडे यांना पाचारण केले. यावेळी पोलीसांची कुमक पाहुन शेतकरी भयभीत झाले. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

नदीजोडचे शिर्षकच गायब

नदीजोड या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक निधीत स्वतंत्र शिर्षकाखाली खर्च मंजुर केला जात होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासुन हे शिर्षकच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लोकशाहीदिनीच अपमान

आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही दिनात तरी न्याय मिळेल या आशेने या तीनही गावातील शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हा नियोजन भवनात सुरू असलेल्या लोकशाही दिनात या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेतली.

सुरवातीला जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. ज्यावेळी शेतकर्‍यांनी सामुहीक आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी ‘तुम्हाला जे करायचे ते करा… तुमचे मार्ग मोकळे आहेत’ असे सांगुन शेतकर्‍यांचा अपमान केला.

हा अपमान सहन न झाल्याने शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाविरूध्द आक्रमक भुमिका घेत आरडाओरड केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चांगलीच गर्दी जमली.

प्रशासनाकडून शेतकर्‍यांची फसवणूक – अमोल पाटील

गेल्या १० वर्षापासुन शेतकरी भुसंपादनाच्या मोबदल्यासाठी खेट्या मारीत असुन जिल्हा प्रशासन मात्र आश्‍वासनावर बोळवण करून फसवणुक केली असल्याचा आरोप शेतकरी अमोल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच ते म्हणाले की, आम्ही आमच्या हक्काची मागणी करण्यासाठी याठिकाणी आलो होतो.

पण जिल्हाधिकार्‍यांनी आम्हाला अपमानास्पद वागणुक देत पोलीस बोलावुन लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांची २ कोटी ७८ लाख रूपयांची मागणी आहे.

जोपर्यंत मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले. यावेळी अनिल राठोड, बळीराम पवार, बाळु राठोड, राजु पवार, गुलाबराव पाटील, कैलास राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*