प्रा.दगडू पाटील खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

0
अमळनेर | प्रतिनिधी :  पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील प्रा दगडू पाटील यांच्या खून प्रकरणी अमळनेर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

रत्नापिंप्री येथील यशवंत किसन माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्ष पदाच्या वादातून प्रा. दगडू यशवंत पाटील हे १८ ऑक्टोबर २०१३ रोजी दुपारी स्वतःच्या शेतात विहिरीजवळ काम करीत असताना रवींद्र रामभाऊ पाटील याने दिनकर रामदास पाटील यांच्या मदतीने सुरत येथील सुनील विलास पाटील व किरण प्रकाश पाटील यांना सुपारी देऊन दगडू पाटील यांचा खून करण्यास सांगितले होते.

त्यामुळे प्रा डी जी पाटील हे त्यांच्या शेतात मोटार घरात काम करीत असतांना किरण याने रत्नापिंप्री शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळेल का? असे विचारपूस सुरु केली आणि खिशातून रुमाल काढून त्यांचा गळा आवळला तसेच दोन विषारी इंजेक्शन प्रा. पाटील यांच्या मांडीवर मारले.

मात्र सुई तुटल्याने तो प्रयत्न फसला होता. तसेच सुनील याने प्रा. पाटील यांचे गुप्तांग पिरगळुन त्यावर दगड मारून शेजारच्या पाण्याच्या कुंडावर नेत तोंड बुडविले. पाच ते सहा मिनिटे तोंड दाबून ठेवल्यानंतर ते मेल्याची खात्री झाल्यावर त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि निर्घृण खून करून ते त्या ठिकानाहून पळून गेले सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांची शेती करणारे रामदास पाटील यांना त्यांचा मृतदेह दिसला

त्यांनी दगडू पाटील यांचे पुतणे सतीश पाटील यांना माहिती देत पोलिसांना माहिती देण्यात आली २०रोजी प्रा दगडू पाटील यांचा मुलगा भूषण पाटील यांनी पोलिसात शाळेत अध्यक्ष पदावरून वाद झाल्याने वडिलांचा खून झाल्याची फिर्याद दिल्यावरून रवींद्र पाटील, दिनकर पाटील, किरण पाटील व प्रकाश आत्माराम पाटील यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला भा.दं.वि. ३०२ , १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदवून तिघांना २१ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.

दरम्यान याबाबत पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास करीत महत्वपूर्ण पुरावे गोळा केले होते. पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या पथकातील सहा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, हे कॉ मुरलीधर आमोदेकर, विजय पाटील, रविंद्र गिरासे, तुकाराम निंबाळकर, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील यांच्या पथकाने २० दिवसात संपूर्ण गुन्ह्याचा तपास लावला.

तपासादरम्यान चौकशी केली असता रवींद्र रामभाऊ पाटील, गोपाळ जगतसिंग गिरासे, अनिल रामचंद्र सोनवणे, केशरलाल पुंडलिक पाटील यांच्या मदतीने मृत दगडू पाटील यांना २५/०२/२०१२ रोजी व ४/८/१२ रोजी अमळनेर-पारोळा रस्त्यावर बहादरपूर दरम्यान जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, असे निष्पन्न झाले.

त्यावरून सर्व आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, १२० ब, २०९ तसेच आरोपी गोपाळ जगतसिंग गिरासे, अनिल रामचंद्र सोनवणे, केशरलाल पुंडलिक पाटील यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७ प्रमाणे दोषारोप पत्र दाखल झाले होते. फिर्यादी भूषण दगडू पाटील यांनी विधी व न्याय मंत्रालय यांच्याकडे केलेल्या मागणीवरून या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून मयूर जे. अफुवाले यांची नेमणूक करण्यात आली होती.

तर ऍड.प्रदीप भट यांनी त्यांना मदत केली होती. खटल्यात विशेष सरकारी वकील यांनी ३४ साक्षीदार तपासले होते. त्या सर्वांचा पुरावा ग्राह्य धरत जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आरोपी रवींद्र रामदास पाटील, दिनकर रामदास पाटील, सुनील भीमराव पाटील, किरण प्रकाश पाटील यांनी कट रचून खून केला म्हणून यांना भादंवि कलम ३०२, १२० ब प्रमाणे प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी १५ हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद, व भादंवि कलम ३०२ प्रमाणे चौघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

उर्वरित संशयित प्रकाश पाटील, मिनाबाई गिरासे, गोपाळ गिरासे, अनिल सोनवणे, केशरलाल पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

LEAVE A REPLY

*