बलिप्रतिपदेला सरकारविरुद्ध ३०२ चा गुन्हा

0

जळगाव | प्रतिनिधी  : शेतकर्‍याला सरसकट कर्जमुक्ती व उत्पन्नाच्या दिडपट हमीभाव मिळावा यासाठी सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरात बालिप्रतिपदेला पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून सरकारविरुध्द ३०२चा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ८ नोंव्हेबरला नोटबंदीचे श्राध्द करण्याचा ठराव राज्यव्यापी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभाव परिषदेत करण्यात आला.

शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने राज्यव्यापी भव्य शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभाव परिषदेचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. राजु शेट्टी, आ. बच्चू कडू, सुकाणू समितीचे राज्य सदस्य रघुनाथ पाटील, डॉ. बाबा आढाव, डॉ. अजित नवले, सुशिला मोराळे, प्रतिभा शिंदे, कॉ. किशोर ढमाले, कॉ. अशोक ढवळे, नामदेव गांवडे, संजय पवार, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, झिलाबाई वसावे, करण गायकर, फईम पटेल, कॉ. किसन गुजर, राजू देसले, अशफाक पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवातीला ढोल, टाळ, मृदुंग वाजवून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कर्जमाफीची फसवी घोषणा करणार्‍यांविरुध्द पुढील दिशा ठरविण्यासाठी तसेच पुन्हा एकदा संघर्षाचा एल्गार पेटविण्यासाठी या राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री यांना ध्वंजावंदन विरोध करण्यासाठी गेले असता, त्यांनी अस्पृश्य आहे का असे म्हटले होते.

त्यांच्या डोक्यात जात, धर्म भिनला आहे. ना. महाजनांनी कापसाच्या हमीभावासाठी ११ दिवस आंदोलन केले होते आणि आता हमीभावाबाबत ना. महाजनांची चुप्पी का? असा सवाल प्रतिभा शिंदे यांनी प्रास्ताविकातून उपस्थित केला. तसेच सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली ३४ हजार कोटी रुपयांचे गाजर दाखवून ऑनलाईनच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता सरकारलाच ऑफलाईन करण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या अर्जाबाबत दररोज वेगवेगळे आकडे दाखविले जाऊन दिशाभुल केली जात आहे. सरकार कर्जमुक्तीबाबत शब्दांचे खेळ खेळत आहे. मेक इन इंडियाचा बोलबाला करणार्‍या सरकारच्या विरोधात अभियंत्यासह अंगणवाडीसेविका, मदतनीसांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. हमीभाव देण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे.

कोणत्याच बँकेने कर्जमाफीचे पैसे देण्यासाठी हिरवा कंदिल दिला नसून सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या एकही आश्‍वासनाची पूर्तता केली नसल्याने राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु केलेल्या कर्जमाफी योजनचे नाव बदलवून ‘फोकनाड नरेंद्र मोदी कर्जमाफी योजना’ असे ठेवावे अशी खोचट टिका परिषदेत सरकारवर करण्यात आली. परिषदेचे सुत्रसंचालन शंभु पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने परिषदेचा समारोप करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या परिषदेत खान्देशातील हजारो शेतकरी व आदिवासी बांधव उपस्थित होते.

असे आहेत ठराव..

कर्जमाफीसाठी सरकारला ऑफलाईन करण्यासाठी भाग पाडणे.

दोन लाख अंगणवाडीसेविकांच्या बेमुदत संपाला पाठींबा देणे.

८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राध्द.

सत्याग्रह नोंदणी करणे.

हमीभाव देण्याची जबाबदारी केंद्र व राज्यसरकारचीश्र कर्जमाफी योजनेचे नाव बदलविणे.

LEAVE A REPLY

*