मुंबई । दि.19 । वृत्तसंस्था-मुंबई, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढले. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला.
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर रेल्वेवर अंधेरीजवळ झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक वांद्रेपर्यंतच सुरू आहे. पावसामुळे पाणी साचले नसले तरी सर्वच यंत्रणांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील काही कार्यालयांतील कर्मचार्‍यांना लवकर घरी सोडण्यात आले आहे.

कोकणपट्ट्यासह मुंबई आणि उपनगरात वादळी वार्‍यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह धुव्वाधार पाऊस पडत आहे. मुंबईत, विशेषत: दक्षिण मुंबईत ढगांच्या गडगडाटांसह पाऊस पडत आहे. भरदुपारी मुंबईत ढग दाटून आल्याने अंधार झाला. ऑगस्टमध्ये पावसाने मुंबईची दाणादाण उडाली होती.

त्या आठवणीने मुंबईकराच्या पोटात पुन्हा भीतीचा गोळा उठला. पावसामुळे पुन्हा अडकण्याच्या भितीने पावसाला सुरुवात होताच मुंबईतील अनेक चाकरमान्यांंनी घर गाठण्यासाठी लवकर कार्यालयातून निघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुपारपासूनच रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली.

कोकणात रात्रीपासून वादळी वार्‍यासह पडणार्‍या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर कायम असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीतील शाळांना पावसामुळे सुट्टी दिल्याचे वृत्त आहे.

आंजर्ले येथील समुद्रकिनार्‍याजवळ एक मच्छिमार बोट बुडाली. तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बोटीतील सात मच्छिमारांचा जीव वाचवला. पावसाचा जोर कायम असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीतील शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आल्याचे समजते.

या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील भेडशी, कुडाळ तालुक्यातील आंबेरी व शिवापूर, मालवण तालुक्यातील मालवण-बागायत, कांदळगाव-मसुरे, कसाल-वायंगवडे मार्गावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. कोकणातील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पिट ढवळ पुलावरही पुराचे आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यासह धरण परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

राधानगरी धरणाचे सर्व सातही स्वंयचलित दरवाजे उघडण्यात आले असून 12 हजार 200 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

LEAVE A REPLY

*