पुणे । दि.16 । प्रतिनिधी-माझ्या राजकीय कारकिर्दीत मी आठ मुख्यमंत्री पाहिले. मात्र कधीही माझ्यावर आरोप झाले नाही.अनेक खात्यांचे विविध पदे भूषविली.
मंत्रीपद असो वा नसो सतत काम करीत राहिलो. परंतु वर्ष-दिड वर्षात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि तब्बल एक वर्षाच्या काळात माझ्या अनेक चौकश्या झाल्या, अशा मंत्री पदाला मी लाथ मारेन कारण मी मंत्रीपदासाठी नाही तर जनतेसाठी काम करीत आहे.
गोपिनाथ मुंढे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी असती ,आता मी पुढील आरोपांची वाट पहात आहे, कारण त्यामध्ये देखील काही आढळणार नाही.

परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा काही ना काही उकरुन काढत टी.व्ही वर फक्त एकनाथ खडसेच दिसत राहिला. या दोन महिन्यात मी मरणापेक्षा वाईट मरण मी अनुभवले.

मात्र जनता माझ्या सोबत आहे.आणि त्यांच्या पाठिंब्यावर मी माझे काम सुरुच ठेवणार आहे असे रोखठोख प्रतिपादन राज्याचे माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुण्यात केले.

जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात जिवंत असुन यापुढेही जनतेची सेवा करणार आहे. त्यामुळे मी ज्याप्रमाणे संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा, असेही खडसे म्हणाले.

पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयुटच्या वर्धापनदिनानिमित्त प्रा. डॉ. सुधाकर जाधव शैक्षणिक संकुलात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एकनाथराव खडसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी, आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ सुधाकरराव जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधव आदी उपस्थित होते.

जाधव करंडक स्पर्धेपासून सुरु झालेल्या विविध उपक्रमांचा समारोप वर्धापनदिनाच्या मुख्य कार्यक्रमाने झाला. ते पुढे म्हणाले की, राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही.

राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनूभविले आहेत. सध्या हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, ज्याची धर्मशाळा झाली आहे. बाहेरील देशातून येथे अनेकजण येतात, त्यांना नागरिकत्त्व दिले जाते. तेच लोक आपल्या येथे बॉम्ब टाकतात. त्यामुळे अशांना देशाबाहेर काढायला हवे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तोंडावर गोड बोलणार्‍यांचेच कारस्थान
राजकीय जीवनात तोंडावर गोड बोलून आतून कटकारस्थान करणारे अनेक जण भेटले. सकाळी गोड बोलतात मात्र दुपारुन कटकारस्थानात अनेक जण मग्न असतात परंतु एकनाथ खडसे अशा कटकारस्थानांना घाबरत नाही. जनता-जनार्दनाच्या बळावर सर्वांशी लढा देण्याची शक्ती या
समाजानेच मला दिली आहे. यापुढेही त्यांच्या आशीर्वादाने माझी समाजसेवा सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले.

संघर्षाचा लढा सुरुच राहणार !
जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती असे अनेकांना वाटते.

मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून आता खर्‍या अर्थाने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. आता शुन्यातून विश्व निर्माण करेन.

इतरांनी यामाध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले असल्याने कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. भाजपची काही काळापुर्वी ब्राह्मण समाजाचा पक्ष अशी ओळख होती.

मात्र, आता सर्वसमावेशक पक्ष म्हणून भाजपची ओळख झाली आहे. आज पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंंडे असते तर राज्यातील राजकारणाची दिशा वेगळी असती असे ते म्हणाले.

गोपीनाथ मुंडेंची आठवण काढताना त्यांना गहिवरुन आले. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरु झाली असून ती अशीच कायम राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*