रोकड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना साकडे : जिल्हा बँक अध्यक्षांसह संचालकांचे निवेदन

0
जळगाव |  प्रतिनिधी :  पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँक शाखांना रोख रक्कम उपलब्ध करून मिळावी या मागणीसाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहीणी खडसे व संचालक मंडळ आज चक्क दिशा समितीच्या सभेत येऊन धडकले. याठिकाणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार जिल्हा बँकेतर्फे शेतकरी सभासदांना रूपे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. परंतु जिल्हा बँकेच्या शाखा ह्या ग्रामीण भागात असल्याने एटीएमची सुविधा उपलब्ध नाही. तसेच इतर एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहे.

जिल्हा बँककडुन शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवुन देण्यात आले आहे. मात्र जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये रोख रक्कम नसल्याने शेतकर्‍यांची कर्जाची गरज भागविता येत नाही.

यासंदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहीणी खडसे व संचालक मंडळ आज अचानक दिशा समितीच्या सभेत येऊन धडकले. याठिकाणी उपस्थित असलेले खा. ए.टी.पाटील, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासमोर अध्यक्षांसह संचालकांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या.

तसेच पीककर्ज वाटपासाठी रोख रक्कम उपलब्ध करून मिळावी अशा मागणीचे साकडेही निवेदनाद्वारे घालण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, वाडीलाल राठोड, अमोल पाटील, नानासाहेब देशमुख, तिलोत्तमा पाटील, गणेश नेहते, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*