जळगाव महापालिकेविरुद्ध विधानभवनात हक्कभंग मांडा : दिशा समितीच्या सभेत आमदारांसह खासदारांची नाराजी

0
जळगाव | प्रतिनिधी :  केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविणार्‍या महापालिका प्रशासनाकडुन स्थानिक खासदार व आमदारांना माहीती दिली जात नसेल तर विधानभवनात हक्कभंग मांडा अशी मागणी शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी आज दिशा समितीच्या सभेत केली.
दरम्यान दिशा समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील, आ.राजुमामा भोळे यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला.

दिशा समितीची सभा खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आज पार पडली. सभेत अमृत योजनेच्या विषयासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी माहीती सादर केली.

यावेळी आ. राजुमामा भोळे यांनी रिंगरोड येथे रस्ता खोदुन ठेवल्याबाबत आयुक्त जीवन सोनवणे यांना जाब विचारला. तसेच केंद्र आणि राज्यात आमचे सरकार असतांनाही महापालिका प्रशासन स्थानिक खासदार आणि आमदारांना कामांची माहीती का देत नाही? असा प्रश्‍न उपस्थित करून आ. राजुमामा भोळे यांनी आयुक्तांवर संताप व्यक्त केला.

खा. ए.टी. पाटील यांनीही त्यांना फैलावर घेत केंद्राच्या योजना राबवितांना लोकसभा सदस्यांना माहीती देणे आवश्यक असल्याचे सांगत एकही बैठकांना महापालिका आमंत्रीत करीत नसल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.

याविषयासंदर्भात शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदार आणि खासदारांना महापालिका प्रशासनाने माहीती दिलीच पाहीजे तो त्यांचा हक्क आहे असे सांगितले.

तसेच आमदार आणि खासदारांच्या हक्कांवर गदा आणणार्‍या महापालिकेविरूध्द विधानभवनात हक्कभंग मांडा अशी मागणीही त्यांनी दिशा समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील यांच्याकडे केली. अखेर खा.ए.टी. पाटील यांनी सोमवारी यासंदर्भात महापालिकेत बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले.

रेल्वेची भींत तोडण्यासाठी अधिकाराचा वापर करणार

गोविंदा रिक्षा स्टॉप ते खान्देश सेंट्रलपर्यंतच्या रस्त्यासाठी रेल्वेची भींत तोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी सहकार्य न केल्यास जिल्हा दंडाधिकारी म्हणून अधिकाराचा वापर केला जाईल, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.

ग्रामसडक योजनेत चिरीमीरी

पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये अभियंत्यांकडून चिरीमीरी सुरु असल्याचा आरोप आ.स्मिता वाघ यांनी सभेत केला. याबाबत अहवाल मागविण्याचे आदेश खा.पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

 

सभेमध्ये २८ योजनांचा आढावा घेण्यात आला. सभेत आ.चंदुलाल पटेल, आ.उन्मेश पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.संजय सावकारे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

ऑगस्टअखेर चौपदरीकरणाचे काम सुरु होणार

दिशा समितीच्या सभेत चौपदरीकरणासंदर्भात माहिती घेण्यात आली. प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी माहिती देतांना सांगितले की, अमरावती ते गुजरात असे चार पॅकेज चौपदरीकरणाचे करण्यात आले आहे.

यात जळगाव जिल्ह्यातून १४० किलोमीटरचा समावेश आहे. चिखली ते तरसोद आणि तरसोद ते फागणे असे दोन टप्पे करण्यात आले आहे. या दोन्ही टप्प्यांच्या कामांसाठी करार देखील झालेला आहे. साधारणतः ऑगस्ट अखेरपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

वरणगाव, जळगाव, मुकटी, पारोळा असे चार बायपास असून गावालगत एक्झीटींग मार्ग देखील आहेत. समांतर रस्त्याचे देखील प्रश्‍न सोडविण्यात आले असून साईड पट्ट्यांचे काम बी.एन. अग्रवाल यांना देण्यात आले आहे.

समांतर रस्त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे अरविंद काळे यांनी सांगितले. यावेळी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी काळी माती मिश्रीत मुरुमाचा वापर साईडपट्ट्या भरण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले.

तसेच आ.राजूमामा भोळे यांनी स्थानिक अधिकारी त्याठिकाणी नेमले जावेत, अशी मागणी केली. त्यावर खा.ए.टी. पाटील यांनी दर आठवड्याच्या सोमवारी या कामांचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले.

नशिराबादचा टोलनाका बंद का होत नाही – आ.जावळे

गेल्या दहा वर्षापासून नशिराबादचा टोलनाका हा सुरुच आहे. तो बंद का होत नाही? असा सवाल आ.हरीभाऊ जावळे यांनी उपस्थित केला.

याबाबत खा.ए.टी. पाटील यांनी पीडब्ल्यूडी व महामार्गाच्या अधिकार्‍यांना विचारले असता, या दोन्ही अधिकार्‍यांनी टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले. याविषयी माहिती घेण्याची सूचनाही खा.ए.टी. पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

*