‘स्वरानुभूति’त रसिकांना मिळणार शास्त्रीय संगीताची ‘मेजवानी’: देशभरातील सहा कलावंताचा गौरव

0
जळगाव | प्रतिनिधी : अनुभूती निवासी शाळेतर्फे “पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारंभ-२०१७” अंतर्गत “स्वरानुभूति पुष्प दुसरे”   या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी भारतातील  जेष्ठ कलावंतासह नवोदित कलावंत  आपली कला सादर करतील. दिल्ली येथील प्रसिद्ध कला समीक्षक, लेखक, ज्येष्ठ तबला विद्‌वान पंडित विजयशंकर मिश्रा यांच्यासह सहा कलावंताना सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम ७, ८ सप्टेंबर दरम्यान कांताई सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

संगीतकार, वाद्यनिर्माते, लेखक यांच्यासह सर्व कलाकारांचा आदर करणे आणि देशाच्या ज्येष्ठ कलाकारांबरोबर स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, जळगाव शहरात शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षापासून ‘स्वरानुभूति’ संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

यानिमित्ताने जळगावातील रसिकांना  गायन, वादन  आणि नृत्य  यांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. अनुभूती निवासी शाळेचे हे दशकपुर्ती वर्ष आहे.

कार्यक्रमाची सुरूवात कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने दि. ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होईल. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पंडीत विजयशंकर मिश्रा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, डॉ. संगिता म्हसकर हे प्रमुख पाहुणे असतील. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलावंतांना‘स्वरानुभूति, तालानुभूति, लयानुभूति, संगीतानुभूति’ या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

यानंतर शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला सुरवात होईल. यात गिरजादेवी, पंडीत बिरजु महाराज यासारख्या ज्येष्ठ कलावंतासोबत तबल्यावर साथ संगत देणारे वरिष्ठ तबलावादक पंडीत रविनाथ मिश्रा यांचा तबलावादन होईल.

कस्तुरी बंदोपाध्याय यांचे गायन होईल. यावेळी पंडीत रविनाथ मिश्रा, पंडीत सुधीर नायक यांचे शिष्य आकाश विश्वाल हार्मोनियमवर संगत देतील. ऑस्ट्रेलिया,अमेरिका, ब्रिटेन यासह जगभरात कला सादर करून रसिकांना मोहिनी घालणारे पुणे येथील पंडीत मिलिंद तुळणकर  जलतरंग वादन  सादर करतील.

त्यांच्यासोबत पंडीत सुरेश तलवलकर यांचे शिष्य गणेश तनवाडे तबला संगत देतील. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अनुभूतीच्या कत्थक नृत्य शिक्षिका  आर्या शेंदुर्णीकर नृत्य सादर करतील. अनुभूतीचे संगीत शिक्षक निखील क्षीरसागर यांचे गायन होईल.

दि. ८ सप्टेबर रोजी समारोप होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जैन परिवारातील ज्येष्ठ सेवादास दलिचंद जैन आणि जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल.

प्रसंगी तानसेन महोत्सव, हरिदास महोत्सव यासारख्या मोठ्या कार्यक्रमांत व्हायोलियन वादनाने रसिकांना भुरळ घालणारे पंडीत कमल कामले यांचे व्हायोलियन वादन होईल. यावेळी अमृतेश शांडिल्य तबल्यावर साथसंगत देतील. प्रा.  संजय पत्की यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. याप्रसंगी तबल्यावर रविनाथ मिश्रा तर हार्मोनियमवर आकाश विश्वाल असतील.

देशभरातील या प्रसिद्ध कलावंताचा होणार सन्मान

दिल्ली येथील ज्येष्ठ तबला वादक पंडीत विजयशंकर मिश्रा यांना ‘संगीतानुभूति’पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. लखनऊ येथील भातखंडे विद्यालयातील ज्येष्ठ तबलावादक पंडीत रविनाथ मिश्रा यांना ‘तालानुभूति’, कोलकाता येथील  प्रसिध्द गायिका विदुषी  कस्तुरी बंदोपाध्याय यांना ‘स्वरानुभूति’, पुणे येथील जलतरंग वादक पंडीत मिलिंद तुळणकर  यांना‘लयानुभूति’, इंदोर येथील  पंडीत कमल कामले यांना ‘लयानुभूति’, प्रसिद्ध गायक  संजय पत्की यांना ‘स्वरानुभूति’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*