Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

वार्षिक गुणगौरवाने विद्यार्थ्यांना स्फूर्ती : शरद महाजन

Share

न्हावी, ता. यावल । दि. 4 । वार्ताहर :  शाळेत होणार्‍या वार्षिक गुणगौरवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवीन स्फूर्ती मिळत असते. त्या माध्यमातून ते पुढील वाटचाल करण्यासाठी प्रेरित होतात. गुणगौरव प्राप्त विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेला अभिमान बाळगून गुरुजन ,आई-वडील, मित्रमंडळी यांचाही आपल्या यशात मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवावी. शाळेने आज पर्यंत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांचाही सहभाग आहेच. म्हणूनच भारत विद्यालयाचे नाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये अग्रणी आहे, असे प्रतिपादन म. सा. का. चेअरमन शरद महाजन यांनी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण प्रसंगी केले.

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून शरद महाजन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिभाऊ जावळे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, यावल कृउबा सभापती भानुदास चोपडे, दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी ,खरेदी-विक्री संघ यावलचे संचालक सुनील फिरके व यशवंत तळेले, यावल कृउबा संचालक उमेश बेंडाळे, माजी चेअरमन पी. एच. महाजन उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका तीलोत्तमा चौधरी यांनी केले.ईशस्तवन व स्वागतगीत विद्यार्थिनींनी म्हटले.मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले .पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करा : आ. जावळे

यावेळी बोलतांना आमदार हरिभाऊ जावळे- म्हणाले की शालेय जीवनातील बक्षीस वितरण हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आठवणीतला व सुंदर क्षण असतो.जीवनात अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. जिद्द ,मेहनत, परिश्रम केल्याशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही.प्रयत्नशील राहा.यश नक्कीच मिळते.

सोशल मिडीयापासून दूर राहावे : प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून आदर्श व्यक्तींची प्रेरणा घ्यावी.शालेय जीवनातील मिळणार्‍या बक्षीसांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा. प्रत्येक गोष्ट करत असताना आत्मविश्वास व कार्य करण्याची क्षमता असावी. तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.आज प्रत्येक दिवसागणिक तंत्रज्ञानात प्रगती होत असून डिजिटल इंडिया चे स्वप्न आपण पहात आहोत.सर्व विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे.अभ्यासात लक्ष घालावे. व आपले ध्येय गाठावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी नवविकास या हस्तलिखिताचे प्रकाशन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले.

मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी यांनी जसा चातक पक्षी पावसाची ओढ धरतो, मोती शिंपल्यांची वाट पाहतो ,त्याच प्रमाणे आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभाची आतुरतेने वाट पाहत असतो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे शाळेच्या कीर्तीत भर घालणारे असते. ते त्यांना प्रोत्साहन देणारे ठरते असे विचार त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन मिलिंद महाजन ,सेक्रेटरी गितेश्वर भंगाळे, संचालक दीपक फिरके, वामन नेहते, वसंत महाजन, राजेश तळेले, संजय चौधरी, अविनाश फिरके, जयंत बेंडाळे ,रवींद्र गोलते, संदेश महाजन, केंद्रप्रमुख सुलोचना बोरोले उपस्थित होते. आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावी मधून रवींद्र नरेंद्र पाटील याची निवड झाली.

तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून इयत्ता बारावीतील यशश्री किशोर बर्‍हाटे हिची निवड करण्यात आली. मनोगतातून दहावीत प्रथम आलेली हिताली झोपे व द्वितीय आलेली यज्ञा लढे , कल्याणी पाटील, यशश्री बर्‍हाटे , राखी नेहेते, रवींद्र पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या यशाचे श्रेय गुरुजन, संस्थाचालक यांना देऊन शाळेबद्दल ऋण व्यक्त केले.

शाळेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापिका आशा राणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी. एच. तळेले, माध्यमिक ,प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संगीता फिरके, व्ही. बी. वारके, संदीप घुले, विद्यार्थी पार्थ चौधरी, सानिका पवार, दीक्षा वाघुळदे , पूजा इंगळे, नेहा चौधरी यांनी केले. आभार खुशी फिरके हिने मानले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!