डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांची आदर्शनगरात धाव

0
जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. शहरात अनेक परिसरांमध्ये डेंग्यू सदृष्य साथ रोगाची लागण झाली आहे.
नियमितपणे स्वच्छ राहणार्‍या आदर्शनगरात डेंग्यू सदृष्य रुग्ण आढळल्याने आ.राजूमामा भोळे यांच्यासह मनपाच्या अधिकार्‍यांनी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान, परिसरात धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटींग करण्यात आली.

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने उपाययोजना करण्याबाबत वारंवार तक्रारी करुन सांगितले. मात्र मनपा प्रशासन कुठलीही दखल घेत नाही.

काही दिवसापूर्वी भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, मनसेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

तसेच उपाययोजना करीत नसल्याने आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. येत्या आठ दिवसात संपूर्ण शहरात धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटींग करण्यात येईल. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

मात्र अद्यापही साथ रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केली गेली नाही. शहरातील अनेक भागांसह आदर्शनगरात देखील डेंग्यू सदृष्य लागण झालेला रुग्ण आढळला.

दरम्यान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. ही माहिती होताच जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी असलेले आ.राजूमामा भोळे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, जितेंद्र मुंदडा, ज्योती चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रतिभा शिरसाठ, जमील देशमुख यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, आरोग्य निरीक्षक संजय दंडोरे तसेच मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी परिसरात येवून पाहणी केली. दरम्यान उपाययोजना करण्याबाबत आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना सूचना देण्यात आला. त्यानंतर परिसरात धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटींग करण्यात येवून साफसफाई देखील करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*