नगरदेवळ्यावर पाणी टंचाईचे सावट : चार कोटीच्या पेयजल योजनेचा बोजवारा

0
पाचोरा | प्रतिनिधी :  पाचोरा तालुक्यात मोठ्या लोकवस्तिचे गाव म्हणून ओळखला जाणार्‍या नगरदेवळा गावासह परिसरातील भागास पाणी टंचाईचे सावट गडद होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

या परिसरात पिण्याच्या व शेतीसाठी पुरवठा करणार्‍या धरणातून पाणी गळती होत आहे. तर दुसरीकडे ह्याच भागातील नद्यामधून प्रचंड प्रमाणात वाळू चोरीमुळे पाणीसाठा संपूर्ण विहिरी कोरड्या होत आहे.

पाणी गळतीकडे पाटबंधारे तर वाळूचोरीकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येणार्‍या दिवसात नगरदेवळा वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू शकते?

अग्नावती धरणात मृतसाठा

नगरदेवळा गावासह परिसराला पाणी पुरवठा करणारे अग्नावती धरण मागील वर्षी चांगल्या स्वरूपात पडलेल्या पावसामुळे १०० टक्के भरले होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या नियोजन शुन्य कारभार व अवैध पाणी उपश्यासह धरणताल पाणी गळतीमुळे या धरणात आजच्या स्थितीला मृतसाठाच शिल्लक राहिल्याने पावसाळ्यात पुरेसे व मुबलक पाणी पडण्याची वाट पहावी लागेपर्यंत नगरदेवळा गावाला धरणातील मृत साठ्यावर पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे.

निम्मे अधिक गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर कोरडीठाक पडल्याने ह्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून काही भागात पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ आली आहे. तसेच धरणापासून ते सरदार के.एस.पवार विद्यालयापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिणीची आज गावाला काळाची गरज आहे. ही व्यवस्था झाल्यास गावातील काही प्रभागांना याचा फायदा होवू शकतो.

सद्यस्थितीत गावाला ८ ते १० दिवसाआड पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याने नागरिकांच्या पाण्याच्या समस्येत वाढ झाली असून येणार्‍या काही दिवसात पाणी टंचाईचे सावट गडद होणार आहे.

४ कोटींच्या पेयजल योजनेचा बोजवारा

शासनाकडून ग्रामिण भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी विविध पेयजल योजनांच्या माध्यमातून लाखो ते कोटींपर्यंतच्या योजना ग्रामपंचायतींना दिल्या जातात. नगरदेवळ्यासाठीही ४ कोटी ७८ लाखांची भरभक्कम व मोठ्या आकड्यांची गिरणानदीतून पेयजल योजना कार्यान्वीत करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे.

ही योजना कार्यान्वीत झाल्यास गावाची पाण्याची समस्या कायम स्वरूपी निकाली लागणार आहे. आणि गावकर्‍यांच्या पाण्याची तहान-तृष्णा भागविली जावू शकते. परंतू ही पेयजल योजना मंजूर असूनही कार्यान्वीत होत नसल्याने कोणत्या कारणास्तव ही योजना रखडत आहे.

यामुळे ग्रामस्थांत उलट-सुलट चर्चा असून यासाठी पाठपुरावा कमी पडत असल्याच्याही चर्चा आहे.

पाचोरा तालुक्यात वाळु उपश्याचा कहर

तालुक्याच्या गिरणा नदीसह ग्रामिण भागात गावाशी जोडल्या गेलेल्या सर्वच नद्यामधून वाळु चोरीचे प्रकार महसुल विभागाला थांबविण्यात नेहमीच अपयश आहे.

वाळु चोरांशी कार्यवाही करणार्‍या पथकांचे आर्थिक हितसंबंध, राजकिय दबाव आणि वाळु चोरट्यांची भिती ही महसुल विभागाच्या गस्ती व कार्यवाही पथकांच्या अपयशाची व कामचुकारपणातून मलीदा कमविण्याची मुख्ये कारणे आहेत.

कुंपणच शेत खात असल्यामुळे राखणदाराकडून अपेक्षा ठेवणे उपयोगाचे नाही अशी परिस्थिती महसुल विभागाची आहे.
नगरदेवळच्याच्या काही भागास पाणी पुरवठा करणारी ग्राम ंचायतीची मोठी विहिर सर्वे नं. २९१ मध्ये २५ फुट व्यासाची आहे.

विहिरीला लागून गडद नदीचे पात्र असल्याने पाण्याच्या सिंचनामुळे विहिरीत पाणी जमा होत असल्यामुळे काही प्रमाणात गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची मदत व गरजपूर्ती केली जाते.

मात्र गडद नदितून वाळू चोरटट्यांकडून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीमुळे नदीत मोठे मोठे खड्डे झाल्याने ही विहिर कोरडीठाक पडली आहे.

महसुल विभागाच्या पथकांनी इमानदारी दाखविली असती तर शासनास महसुल तर नगरदेवळा ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले असते.

पाचोरा तालुक्यात वाळू चोरट्यांच्या वाळु चोरीमुळे ग्रामिण भागातील अनेक लहान मोठ्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

नगरदेवळा हा परिसर राजकीय व भ्रष्टाचाराच्या अनेक कारणांमुळे प्राप्त तक्रारींवरून चर्चेत असतांना भविष्यात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईमुळे ह्या परिसरात पाणी पेटण्याचे चिन्ह दिसत आहे.

LEAVE A REPLY

*