बहिणाईने जगाला दिले माणूसकीचे तत्वज्ञान : भगवान भटकर

0
जळगाव | प्रतिनिधी :  अक्षर ओळख नसतांनाही खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांनी काव्यातून जगाला माणुसकीचे तत्वज्ञान दिले. रोजच्या जीवनातील अनेक पैलु त्यांनी कवितेच्या माध्यमातून साध्या सोप्या भाषेत मांडून काव्यामध्ये क्रांती केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर यांनी केले.

भवरलाल  कांताबाई फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्टतर्फे खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांची १३७वीजयंती चौधरीवाड्यातील ‘बहिणाई स्मृती संग्रहालय’ येथे साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून भगवान भटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरूवातीला दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर बहिणाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यस्थानी बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, कैलास चौधरी, शोभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेतील मराठी विभागातील विद्यार्थी सम्राट गुंड पाटील याने बहिणाईंची ‘मन वढाय वढाय’ ही कविता वाचून दाखविली.

पुर्वा चौधरी हिने विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्याने देत जावे…’ ही कविता सादर केली. यानंतर भगवान भटकर यांनी मनोगत व्यक्त करतांना बहिणाईंच्या कवितांमधील भाव स्पष्ट केला. ‘माणसाने माणुस म्हणून कसे जगले पाहिजे, हे तत्वज्ञान आपल्याला बहिणाबाईंनी दिले.

बहिणाबाईंचे विचार आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली वाहता येईल’ असे ते म्हणाले. बहिणाबाई यांनी कवितेतून स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचे वर्णन केले आहे. स्त्रियांच्या वेदनांवर फुंकर घालणारी ‘गांधारी’ ही स्वलिखीत रचना श्री. भटकर यांनी सादर केली.

यावेळी जैन इगिरेशनचे विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले. किशोर कुळकर्णी, अनुभूतीचे शिक्षक हर्षल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

अशोक चौधरी, दिनेश थोरवे, सुभाष भंगाळे, किरण चौधरी, अशोक अत्तरदे, देवेश चौधरी, हितेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमावेळी अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेतील नोव्हीया बोरोले, अथर्व राजपूत, रितेश महाजन, ओजस बरन, संकेत चौधरी या विद्यार्थ्यांसह बहिणाईंच्या साहित्यावर प्रेम करणारे साहित्यप्रेमी तसेच चौधरी वाड्यातील नागरीक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*