Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

विरोधी पक्षनेत्याचे गुण, पण पक्षांतर करणार नाही : एकनाथराव खडसे यांचा मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखेंना टोला

Share

विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

मुंबई । प्रतिनिधी : ‘मी सत्ताधारी पक्षात आहे हे कधी कधी मी विसरून जातो, विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून माझ्यातून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय, पण मी विखे पाटलांचा आदर्श ठेवणार नाही, पक्षांतर करायचे असते तर आधीच केले असते,’ असा टोला विधानसभेत आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखेंना लगावला.

विधानसभेचे विरोधपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीमाना देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव विधानसभेत मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसेंनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टोला लगावला.

विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला ? आणि सत्तेत का आले ? ते कळले नाही. ‘आई म्हणते बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उत्तराई’, तसे आता वड्डेटीवारांना विखेंना म्हणावे लागेल ‘तुझा होऊ कसा उत्तराई, अशा मिश्किल शैलीत खडसे यांनी वड्डेटीवारांचे अभिनंदन केले.

महाजन, मुनगंटीवारांनाही चिमटा

गिरीश महाजन आत्ता आले आधी ते निर्णयाच्या प्रकियेत नव्हते. ते जवळ झाले. विखेंना मंत्रीपद मिळाले आणि मुनगंटीवार दुसर्‍या, तिसर्‍या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असं सांगत त्यांनी महाजन आणि मुनगंटीवारांनाही चिमटा काढला.

उद्धवजी, काय ठरलंय ते सांगा – खडसे

आ.एकनाथराव खडसे यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायबाबत अप्रत्यक्षपणे भाषणात नाराजीही व्यक्त केली. मात्र आता आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले आहे. आमच्यात नेमके काय ठरलेय ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे. मी उद्धवजींना तेच म्हणतो, काय ठरले ते सांगा, मुख्यमंत्री कुणाचा हा वादविवाद त्यामुळे होणार नाही, असा उपरोधक सल्ला खडसेंनी थेट उद्धव ठाकरेंना दिला.

मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही – पवार

एकनाथराव खडसे आक्रमक विरोधी पक्षनेते होते. ते मंत्रिमंडळात होते. परंतु आरोप झाल्यानंतर ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. पण आता खडसेंना मंत्रिमंडळात स्थान का नाही? हे खडसे व मुख्यमंत्र्यांनाच माहीत. यात महाजन साहेबांचा हात नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्पर्शामुळे महाजन साहेबांचे सोने झाले आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

नीलम गोर्‍हे उपसभापती

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाने उपसभापतीपदावरील दावा सोडल्यानंतर गोर्‍हे यांची निवड निश्चित मानली जात होती. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गोर्‍हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

डॉ. गोर्‍हे या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
विधानपरिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात आली. दुपारपर्यंत उपसभापतीपदासाठी अर्ज भरण्याची वेळ होती. मात्र, जोगेंद्र कवाडे यांनी शर्यतीतून माघार घेतल्याने नीलम गोर्‍हे यांची बिनविरोध निवड झाली.

विधानपरिषदेत पक्षीय बलाबल

विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे 17, काँग्रेसचे 16, भाजपचे 23 , शिवसेनेचे 12, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहे तर, 6 अपक्ष आमदार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!