Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख संपादकीय

भाजपतील नेतृत्व खांदेपालट

Share

भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यात अमित शहा यांची चाणक्यनीती कारणीभूत ठरली. मात्र आता त्यांची केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे भाजपमध्ये कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यावर जे. पी. नड्डा यांची नेमणूक करण्यात आली आहे. मोदी आणि शहा यांच्या विश्वासातल्या नड्डा यांना भाजपपुढील आव्हाने हाताळत पक्षाच्या यशाचा आलेख उंचावण्याचे काम करावे लागेल.

पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अवघ्या देशात भाजपचा विस्तार करण्याचे ठरवले. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी गुजरातमधील आपले विश्वासू सहकारी अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लावली. शहा यांनीही आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. मोदी आणि शहा यांचे सूर चांगलेच जुळले आहेत. मोदी यांचे वक्तृत्व आणि शहा यांची व्यूहनीती यशस्वी झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने तीन राज्ये गमावली असली तरी उत्तर प्रदेशसह अन्य अनेक राज्ये ताब्यात घेतली. ईशान्य भारतात भाजप मजबूत झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी शहा यांच्यावरच होती. त्यांनी भाजपला 73 जागा जिंकून दिल्या.

शहा अगदी खोलात जाऊन अभ्यास करतात. त्यांची व्यूहनीती यशस्वी होते. आता तर लोकसभेत त्यांनी भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्रपक्षांशीही त्यांचा चांगला संपर्क होता. भाजपच्या सदस्यांची संख्या 10 कोटी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगातला सर्वाधिक सदस्य नोंदणी असलेला पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 333 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाजपच्या सदस्यांची संख्याही 13 कोटी करायची आहे. अशा स्थितीत शहा यांची केंद्रीय गृहमंत्री म्हणून निवड झाली.

आता काश्मीर समस्या, नक्षलवाद्यांचा प्रश्न, पूर्वांचलमधला तणाव अशा पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अमित शहा यांना पुरेसा वेळ देणे शक्य नाही. त्यामुळे पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तितकाच समर्थ आणि विश्वासू माणूस हवा होता. त्याचा शोध नड्डा या नावाजवळ संपला. याचे कारण शहा यांच्याइतकेच संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाची युती असतानाही गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या जागा अवघ्या 9 ने कमी झाल्या.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 25-30 जागा मिळतील, असा अंदाज होता. तो मोडीत काढून त्यांनी भाजपला 63 जागांवर नेऊन ठेवले. नड्डा यांच्या याच कामाची दखल घेऊन शहा यांच्यावरची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. शहा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असले तरी त्यांच्याकडची बहुतांश कामे आता नड्डा यांच्याकडे येतील. त्यांच्यासाठी भाजपच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय कार्याध्यक्षपद निर्माण करण्यात आले आहे. ते केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या जवळचे समजले जात असले तरी त्यांचा स्वतःचा असा कोणताही गट नाही, हीच त्यांची जमेची बाजू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ते चालण्यासारखे आहेत. मोदी आणि शहा यांची मर्जी त्यांनी केव्हाच संपादन केली आहे. त्यामुळे त्यांची निवड योग्य असली तरी त्यांच्यापुढची आव्हानेही कमी नाहीत.

अलीकडेच झालेल्या भाजपच्या संसदीय बैठकीत जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती, मात्र त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. जे. पी. नड्डा हे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अभूतपूर्व यश मिळवले पण त्यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी, असे शहा यांनी सांगितले होते.

त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने नड्डा यांची नियुक्ती केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 2014 मध्ये मोदी यांना मिळालेल्या प्रचंड विजयामागे नड्डा यांचीही महत्त्वाची भूमिका होती. राजनाथ सिंह हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हाच नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी ही धुरा शहा यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नड्डा यांच्याकडे आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा जन्म आणि शिक्षण पाटणा इथे झाले.

त्यानंतर ते हिमाचल प्रदेशमध्ये स्थायिक झाले. 1986 पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

नड्डा वयाच्या 33 व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना शहा यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामे करून घेण्याचे कौशल्य नड्डा यांच्या ठायी आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना आणण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. उत्तर प्रदेशमध्ये मतांची टक्केवारी 50 टक्क्यांपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा शहा यांनी नड्डा यांच्याकडे व्यक्त केली होती. नड्डा यांनी ही टक्केवारी 49.6 पर्यंत आणून दाखवली. विद्यार्थीदशेत असताना नड्डा यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही सहभाग नोंदवला होता.

हिमाचल प्रदेशमध्ये शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1984 मध्ये भाजपप्रणीत अभाविपनं स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर जे. पी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. 1986 ते 1989 या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही करण्यात आली.

1998 आणि 2007 या दोन्ही वर्षांमध्येही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे त्यांचा प्रवेश भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. 2012 मध्ये त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवली. त्यानंतर ते शहा यांचे विश्वासू सहकारी झाले. महाराष्ट्र, हरयाणा या दोन राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. हरयाणात भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत तिथे भाजपला चांगले यश मिळाले आहे. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेची साथ आहे. या राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच जादा सदस्य नोंदणी होईपर्यंत अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचे आता जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे कदाचित नड्डा यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊ शकते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने पुन्हा भाजपला साथ दिली. भाजपच्या यशाचा हा वेलू आणखी वर नेण्यासाठी नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचे मोठे आव्हान नड्डा यांच्यापुढे आहे. मोदी आणि शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला भाजप हा पर्याय निर्माण करून ठेवला आहे.

ममतादीदींनी लोकसभेत भाजपपेक्षा चार जागा जास्त मिळवल्या असल्या तरी त्यांच्यापुढे भाजपने चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. आता या राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान नड्डा यांच्यापुढे आहे. पुढच्या वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत द्रमुकने चांगली कामगिरी करून स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. स्टॅलिन, रजनीकांत, कमल हसन यांच्या प्रादेशिक पक्षांपुढे अण्णाद्रमुक तसेच भाजपचे आव्हान कसे टिकेल, हे त्यांना पाहावे लागेल. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये आतापर्यंत बरेचदा ‘ऑपरेशन लोटस्’ अपयशी झाले आहे. आरोग्यमंत्रिपद सांभाळणार्‍या नड्डा यांच्यापुढे ही मोठी अवघड शस्त्रक्रिया करायचे आव्हान आहे.

– प्रा. डॉ. अशोक ढगे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!