Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

आरबीआयमध्ये केंद्र सरकारचा वाढता हस्तक्षेप : डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

Share

मुंबई :  उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर असलेले आचार्य हे कार्यकाळ संपण्याच्या सहा महिनेआधीच पायउतार झाले आहेत.

२३ जानेवारी २०१७ला आचार्य यांनी डेप्युटी गव्हर्नर पदाची सूत्रं स्वीकारली होती. रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून सरकार आणि उर्जित पटेल यांच्यामध्ये उद्भवलेल्या संघर्षामध्ये आचार्य यांनी पटेल यांना पाठिंबा दिला होता. देशाच्या आर्थिक धोरण निश्चितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त असणं गरजेचं आहे, अशी भूमिका आचार्य यांनी सातत्यानं घेतली होती.
उर्जित पटेल यांच्यांनंतर संचालक झालेल्या शक्तीकांत दास आणि आचार्य यांच्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याचं बोललं जात होतं. पतधोरण निश्चितीच्या मुद्द्यावर या दोघांनीही परस्परविरोधी भूमिका घेतल्या होत्या. तसंच केंद्र सरकारचा आरबीआयच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप आचार्य यांना खटकत होता.

आरबीआयमध्ये केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल मागील वर्षी त्यांनी चिंताही व्यक्त केली होती. या कारणांमुळेच आचार्य यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. न्यूयॉर्क विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आचार्य यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून न्यूयॉर्क येथे वास्तव्यास आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!