Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष ?

Share

दिल्ली :   राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वर्णी लागू शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल २० वर्षांनंतर गांधी परिवाराबाहेरील एक व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणार असून त्यांच्यासोबत तीन कार्यकारी अध्यक्षही असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसंच, अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींचाही विचार करण्यात येऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. काँग्रेसवर अनेक वर्षांपासून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. त्या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीनेच पक्षाचे नेतृत्त्व करावं, असं मत गांधी यांनी व्यक्त केलं होतं. त्यानुसार अशोक गेहलोत यांना हे पद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेसमधील एक ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. गेहलोत यांचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. शिवाय, काँग्रेसमधील बहुतेक सर्व नेत्यांचं व कार्यकर्त्यांचं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे. अशोक गेहलोत यांनी तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे तर पाचवेळा ते खासदार राहिले आहेत. राजकारणाचा आणि संघटनात्मक कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. २०१७मध्ये गुजरात निवडणुकांच्या वेळी संघटनात्मक पातळीवर गेहलोत यांनी मोठं काम केलं होतं. ते मागास समाजातील असून काँग्रेसला दलित, ओबीसी समाजाशी पुन्हा जोडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊनच गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्यासोबत तीन कार्यकारी अध्यक्षही असणार आहेत.

गेहलोत यांनी मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल गांधी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बुधवारी गेहलोत यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता त्यांनीच ही जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं समजतं.

… तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि पक्ष संघटनेला वेळ देतील. त्याच्या जागी राजस्थानचे सध्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!