बार्टी केंद्राच्या अनुदानावर डल्ला !

0
जळगाव । दि.18 । प्रतिनिधी-खान्देशातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बार्टीचे स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करण्यात आले होते. त्यासाठी बार्टीकडून लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.
मात्र केंद्रातील एकही विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होवू शकल्याने बार्टीने नाराजी व्यक्त करीत अनुदान रोखले. गेल्या वर्षभरापासून केंद्र बंद असतांनाही विद्यापीठ प्रशासन अनभिज्ञ आहे. परिणामी केंद्र बंद असल्याने खान्देशातील गोर गरीब विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या तयारीपासून वंचित आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पुणे, मुंबईत जावून स्पर्धा परिक्षेचे क्लासेस लावू शकत नाही.

त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बार्टीतर्फे केंद्र सुरु करण्यात आले.

खान्देशात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सन 2012 मध्ये तत्कालीन कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांच्या कार्यकाळात केंद्र सुरु करण्यात आले.

या केंद्राची जबाबदारी प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून डॉ. राकेश रामटेके यांच्याकडे सोपविण्यात आली. स्पर्धा परिक्षा केंद्रात प्रवेशित असणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा स्टायपेंड दिले जाते. तसेच केंद्रप्रमुखांसह तज्ञ व्याख्यातांनाही मानधन दिले जाते.

त्यासाठी बार्टीकडून लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. परंतू सन 2012 ते 2016-17 पर्यंत कें द्रातील एकही विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होवू शकले नसल्याने पुणे येथील बार्टीच्या आधिकार्‍यांना निर्देशनास आले.

समाधानकारक कामगिरी नसल्याने अनुदान रोखण्यात आले आहे. तसेच केंद्र देखील वर्षभरापूर्वीच बंद केल्याचे पुणे येथील बार्टी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

विद्यापीठ प्रशासन अनभिज्ञ
बार्टीने अनुदान रोखल्यामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यापीठातील स्पर्धा परिक्षा केंद्र बंद आहे. केंद्र बंद केल्याबाबत किंवा बार्टीने अनुदान रोखल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी विद्यापीठ प्रशासनाला का सांगितली नाही? विद्यापीठ प्रशासनाला अंधारात का ठेवण्यात आले? बार्टीकडून आलेले पत्र दडपण्यात आले? असे नानाविध प्रश्न उपस्थित होते आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बार्टी स्पर्धा परीक्षेचे केंद्र वर्षभरापासून बंद असल्याने येत्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीपासून वंचित राहणार आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*