अमळनेर बिडीओच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश

0
जळगाव । दि. 18 । प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील दहीवद येथील तत्कालीन ग्रामसेवक याने सन 2013 मध्ये गैरव्यवहार केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर चौकशी होवून ग्रामसेवक पुन्हा रुजु झाल्यानंतर त्याच ग्रामसेवकाला गटविकास अधिकारी यांनी आता पुन्हा दहीवद ग्रामसेवक पदाची जबाबदारी दिली आहे.
हा विषय स्थायी समितीच्या सभेत सदस्य नाना महाजन यांनी उपस्थित करीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांचे संगनमत असल्याचा आरोप केला.
त्याअनुषंगाने सीईओ यांनी ग्रामसेवकांच्या बदलीचे तर गटविकास अधिकार्‍याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत दिले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष ना. उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, सभापती प्रभाकर सोनवणे, सभापती रजनी चव्हाण, सभापती दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, डेप्युटी सीईओ राजन पाटील, समिती सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत सांळुखे, सरोजिनी गरुड, रावसाहेब पाटील, नाना महाजन, प्रताप पाटील यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील दहीवद गावी तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांनी गावातील जमीनीचा गैरव्यवहार केल्याने त्यांना सन 2013 मध्ये निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर चौकशी होवून ग्रामसेवक पाटील यांना पिंपडी येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्याठिकाणी देखील पाटील यांना निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा चौकशी होवून गटविकास अधिकारी ए.व्ही.पटाईत यांनी ग्रामसेवक संजय पाटील यांना पुन्हा दहीवद येथे नियुक्ती दिली.

गैरव्यवहार केलेल्या ग्रामसेवकांला त्याच गावात पुन्हा नियुक्ती देता येत नाही असे असतांना गटविकास अधिकारी यांनी नियुक्ती दिल्याने हा विषय जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन यांनी उपस्थित केला.

सीईओ यांनी स्थायी समितीच्या बैठकीत चुक झाली असल्याचे मान्य करीत ग्रामसेवकांच्या बदलीचे तर गटविकास अधिकारी यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले.

बैठकीत भडगाव तालुक्यातील अंजनविहरे येथील 96 लाभार्थ्यांच्या शौचालयाच्या अनुदानात अपहार केल्याने ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्यात आली आहे.

परंतु अद्याप या लाभार्थी अनुदानापासून वंचित असल्याचा विषय रावसाहेब पाटील यांनी मांडला. यावर सीईओ यांनी चौकशी करून वंचितांना लाभ देण्यात येईल असे सांगितले.

दरवर्षी प्रत्येक तालुक्याला 4 व्यायाम शाळा
स्थायी समितीच्या सभेत आज जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थिती होत्या. यावेळी त्यांनी 297 ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेचे प्रस्ताव प्राप्त झाले असून दरवर्षी प्रत्येक तालुक्याला 4 व्यायाम शाळा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकास्तरावर मिळणार अपंगाचे प्रमाणपत्र
जिल्हातील अपंग बांधवाना प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळते. यासाठी त्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागते.त्यांचे मोठया प्रमाणात हाल होतात.त्यामुळे तालुकानिहाय शिबीर घेण्यात येवून प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे अशी मागणी नाना महाजन यांनी समाजकल्याण सभापती यांच्याकडे केली. यावेळी समाजकल्याण सभापती यांनी तो विषय मंजुर केला.

वजन ठेवून कामे होतात..
जिल्हा परिषदेच्या विविध कामांच्या ठेकेदारांच्या सुरक्षा अनामत तीन वर्षांनंतर पुन्हा परत कराव्या लागतात. परंतु सुरक्षाअनामतच्या फाईली बैठकीत ठेवण्यास अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप नाना महाजन यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष यांनी जि.प मध्ये वजन ठेवून कामे होतात असे मिश्कीलीने म्हणत सत्ताधार्‍यांना घराचा आहेर दिला.यावर सीईओ यांनी दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍याची अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार करा तसेच तक्रार आल्यास निलंबीत करण्यात येईल असे सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*