Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

सूर्यकांत भिसे यांना  मुक्ताई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार 

Share

आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात वितरण

मुक्ताईनगर, दि . १२   :  वारकरी सांप्रदायात प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने यंदापासून सहकार महर्षी भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ ” भागवत धर्म प्रसारक ” हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे . या पहिल्याच पुरस्कारासाठी वेळापूर जि . सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार व राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांची निवड करण्यात आहे .

शुक्रवार दि . १२ जुलै आषाढी एकादशी दिवशी दुपारी २ वाजता संत मुक्ताबाई मठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे या पुरस्काराचे वितरण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांचे हस्ते व माजी आ सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी दिली .

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , श्री पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख विठ्ठल महाराज वासकर , ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विजेते मारोती महाराज कु-हेकर , निवृत्ती महाराज वक्ते , माऊलीच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर , श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ॲड विकास ढगे पाटील , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे , संत सोपानदेव संस्थानचे अध्यक्ष गोपाळ महाराज गोसावी , संत नामदेव महाराज पालखी सोहळा प्रमुख केशव महाराज नामदास , संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी , श्री रुक्मिणीमाता पालखी सोहळा प्रमुख सुरेश महाराज चव्हाण , वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष माऊली जळगावकर , श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती कोकाटे , अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले , बाळासाहेब महाराज देहूकर यांच्यासह वारकरी सांप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले .

पुरस्काराचे स्वरुप

वारकरी सांप्रदायाची व भागवत धर्माची दीक्षा संत निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना दिली . संत ज्ञानदेव , संत नामदेव , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई , संत एकनाथ आदिनी या धर्माचा प्रचार व प्रसार केला . संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला . आज विज्ञान युगात या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे काम वारकरी , फडकरी , दिंडीकरी , कीर्तनकार , प्रवचनकार यांच्या बरोबरच प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणात केला आहे .

त्यामुळेच हा सांप्रदाय जागतिकस्तरावर पोहोचला आहे . प्रसार माध्यमातील पत्रकारांच्या या कार्याची दखल घेवूनच श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने यंदापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे . मानपत्र , सन्मानचिन्ह , फेटा , उपरणे , श्रीफळ व पुष्पहार देवून सूर्यकांत भिसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे .

सूर्यकांत भिसे यांचे कार्य

सूर्यकांत भिसे हे वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर येथील रहिवाशी असून गेली २९ वर्षे त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे . राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यांना शासनाच्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केला आहे .

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात संत तुकाराम महाराजांची आरती सुरु करणे , संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीला नेणे , श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताबाई समाधी सोहळ्यासाठी नेणे , श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट व श्री क्षेत्र नाशिक असे पायी दिंडी पालखी सोहळे त्यांनी सुरु केले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!