Type to search

काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली सुरू

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली सुरू

Share

नवी दिल्ली  :  लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेला नेतृत्वाचा पेच अद्याप कायम आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असल्यानं आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन गांधी कुटुंबाशिवाय निर्णय घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अवघ्या ५२ जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असले तरी राहुल आता माघार घेण्याची शक्यता धूसर आहे.

अशा परिस्थितीत पक्ष कसा चालवायचा याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याला हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार पुढं आला आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक निर्णय घ्यायचे, असा हा प्रस्ताव आहे.

खरंतर, राहुल यांनी राजीनामा दिल्याच्या दिवसापासूनच कार्यकारी अध्यक्ष व सामूहिक निर्णय समितीचा विचार पक्षात सुरू झाला होता. मात्र, राहुल राजीनाम्यावर ठाम असल्यानं सामूहिक नेतृत्वाच्या चर्चेनं पुन्हा जोर धरला आहे.

लोकसभेत राहुलच नेते!

पक्षाच्या अध्यक्षपदावर राहण्यास राहुल गांधी उत्सुक नसले तरी लोकसभेत त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं, असा नेत्यांचा आग्रह आहे. नव्या सरकारच्या कार्यकाळातील संसदेचं पहिलं अधिवेशन १७ जूनपासून सुरू होणार आहे. मावळत्या लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं काँग्रेसचं गटनेतेपद होतं

मात्र, २०१९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे. त्या पदासाठी राहुल यांच्या नावाचा विचार सुरू आहे. राहुल गांधी हे अमेठी या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून हरले असले तरी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!