सरकार शेतकर्‍यांना अंगठा दाखवतंय !

0
जळगाव । दि.16। प्रतिनिधी-राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेतले जात आहे. हे अर्ज भरतांना शेतकर्‍याचा अंगठा घेतला जात आहे.
पण प्रत्यक्षात राज्य सरकारच शेतकर्‍यांना अंगठा दाखवत असल्याची तोफ सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी डागली.
कर्जमाफी आणि तातडीच्या 10 हजार रूपये कर्जासंदर्भात अजिंठा या शासकीय विश्रामगृहात सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील केवळ दोन शेतकर्‍यांना तातडीच्या 10 हजार रूपये मदतीचा लाभ मिळाला आहे.

या मदतीसाठी शेतकर्‍यांकडुन अर्ज भरून घेतले जात आहे. आधीच कर्जमाफीसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पळापळ करतोय.

ऑनलाईन अर्ज भरतांना शेतकर्‍यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात आहे. पण ठसे उमटत नसल्याने बर्‍याच शेतकर्‍यांचे अर्ज भरले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

अत्यंत संथगतीने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असुन अधिकारी आणि बँका ह्या शेतकर्‍यांबाबत उदासिन असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा टोलाही ना. पाटील यांनी पालकमंत्र्यांना लगावला.

दरम्यान राज्य शासनाने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा सल्लाही ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिला.

दोनच शेतकर्‍यांना 10 हजाराचा लाभ

राज्य सरकारने घोषीत केलेल्या तातडीच्या 10 हजार रूपये मदतीचा केवळ दोन शेतकर्‍यांना लाभ झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

दरम्यान कर्जमाफीसाठी आजपर्यंत 15 हजार 960 शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यापुर्वी प्रत्येक शेतकर्‍याला तातडीच्या 10 हजार रूपये मदतीची घोषणा केली होती.

जिल्ह्यात या मदतीसाठी 2 लाख 48 हजार शेतकरी पात्र असतांना केवळ दोनच शेतकर्‍यांना या तातडीच्या मदतीचा लाभ झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यात यावल तालुक्यातील सांगवी बु. येथील यशवंत सोनू महाजन व जामनेर येथील उषाबाई गंगाराम चव्हाण या दोन शेतकर्‍यांना तातडीच्या 10 हजाराचा लाभ झाला आहे.

दरम्यान तातडीच्या 10 हजार रूपयाच्या मदतीसंदर्भात शेतकर्‍यांनी जिल्हा उपनिबंधक जळगाव यांचेकडे तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जमाफीसाठी 15 हजार 960 अर्ज
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत 15 हजार 960 शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*