जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-शेतकरी सुखी तर देश सुखी या तत्वानुसार शेतकर्‍याला सुखी ठेवण्यासाठी विकासाच्या विविध योजना राज्य शासन आखीत असून या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍याला कर्जमुक्तीकडे नेण्यात येत आहे.
सर्वसामान्यांसाठी विकासाच्या योजना राबवून राज्याची विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वा वर्धापन दिननिमीत्त पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम, चिटणीस मंदार कुलकणी, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, शेतकर्‍याला दुष्काळमुक्तीकडे नेण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.

गेल्या दोन वर्षात राज्यातील 11 हजार पेक्षा अधिक गावामध्ये या अभियानाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे सुरु आहे. हे अभियान आता फक्त शासनाचे न राहता ती एक लोक चळवळ झाली आहे.

शेतकर्‍याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभा राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांना होणार असून यासाठी राज्य शासन 34 हजार कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे.

जिल्ह्यात या योजनेचा लाभ 3 लाख शेतकर्‍यांना होणार आहे. तसेच नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनाही 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हयात 16 पैकी 12 नगरपालिका संपूर्ण हगणदारी मुक्त झाल्या असून बोदवड नगरपालिकाही आजच 100 टक्के हगणदारी मुक्त झाल्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयात मुलींचा जन्मदर हजारी 842 होता. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तो आता 903 पर्यत वाढला आहे.

कार्यकर्तृत्वाचा गौरव
पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषि विभागात उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, नारायण देशमुख, विजय भारंबे, दिपक ठाकूर, बाळासाहेब व्यवहारे, लक्ष्मण तळेले व कृषी सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला.

तसेच रावेर तालुक्यातील मोहमांडली जुनी येथील गफुर दल्लु तडवी, समशेरदल्लु तडवी, रमजान गेंदा पावरा, मेहरबान दगडु तडवी या चार शेतकर्‍यांना दोषमुक्त संगणकीकृत सातबार्‍याचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाल्याबद्दल सहा. फौजदार मोजोद्दीन कादर शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल धनराज शिंदे यांना पोलीस पदक जाहिर झाल्याबद्दल, पाटणादेवी येथील धवलतीर्थ येथे बुडणार्‍याला वाचविण्याचे काम करणारे कैलास चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*