जळगावला पालकंमत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करु देण्यास विरोध : शेतकरी सुकाणु समितीचा इशारा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि मालाला हमी भाव मिळून देण्यास अपयशी ठरल्यामुळे पालकमंत्री ध्वजारोहण करण्यास पात्र नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण न करता स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस.बी.पाटील आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, दि.१४ रोजी जळगाव शहरासह जिल्ह्यात आठ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत तीन वेळा कबुली दिली. मात्र शेतकर्‍यांना एकदाही कर्जमाफी मिळाली नाही. असे म्हणत सरकारने खोटे बोलण्याचे रेकॉर्ड मोडले असल्याचा आरोप देखील एस.बी.पाटील यांनी केला. ध्वजारोहणाला विरोध नाही.
परंतु पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रतिभा शिंदे, संजय पवार, ऍड.विजय पाटील, विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे, तुषार चव्हाण, संजु सोनवणे, जगतराव पाटील, सचिन धांडे, महमुद्द बागवान आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक देखील घेण्यात आली. यावेळी जिल्हाभरातील शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकार शेतकर्‍यांना न्याय देण्यास अपयशी
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबाबत पाच सदस्यीय समिती गठीत झाली होती. या समितीत पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांचा समावेश होता. परंतु त्यांनी शेतकर्‍यांना न्याय दिला नाही.
त्यामुळे ते अपयशी ठरले आहेत. तिरंगा आमच्यासाठी प्राण आहे. परंतु पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्याच हस्ते ध्वजारोहण व्हायला पाहिजे. असे लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जळगाव शहरासह आठ ठिकाणी  १४ रोजी रास्ता रोको आंदोलन
शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला दि.१४ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जळगाव शहरात दुपारी २ वाजता बांभोरी पुलावर तसेच जिल्ह्यात आठ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस.बी.पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*