घोटाळ्यांच्या आरोपांवरून मंत्री देसाईं यांनी दिला राजीनामा : मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

0
मुंबई| प्रतिनिधी :  एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांनंतर नैतिकतेच्या मुद्दय़ावरून सुभाष देसाई यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला होता. परंतु, तो त्यांनी नाकारला आहे. स्वतः उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान याबाबत माजी महसुल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनीही सरकारला जाब विचारला होता.

देसाई यांनी नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी पक्षकार्यासाठी वेळ देण्याची इच्छा दाखविली होती. त्यांच्याऐवजी शिवसेनेच्या तरूण नेत्याला मंत्रीपद देण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विचार असल्याची चर्चा गेले काही दिवस होत आहे. देसाई यांना पक्षकार्याची जबाबदारी दिल्यावर मेहता यांच्याबाबतही भाजपला निर्णय घेणे भाग पडणार आहे.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेहता आणि देसाई यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. घोटाळ्याची चौकशी ही कोणत्याही सरकारी यंत्रणेमार्फत होणार नाही. तर ती निष्पक्षपातीपणे होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊडमधील एस. डी. कॉर्पोरेशन राबवीत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासकाला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे प्रकाश मेहता अडचणीत आले होते.

त्यानंतर कांदिवली पूर्व येथील समतानगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित फाइल मंत्री झाल्यानंतर निकालात काढल्याचे आणखी एक प्रकरण समोर आल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती.

तर उद्योगासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीपैकी तब्बल ३१ हजार एकर जमीन भूसंपादनातून वगळल्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.

LEAVE A REPLY

*