उत्तर प्रदेश : रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने ३० मुले दगावली

0
गोरखपूर | वृत्तसंस्था :  उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघवदास रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार १३ मुले एनएनयू वॉर्डमध्ये, तर १७ मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये दाखल होती. ६९ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या कंपनीने गुरुवारी रात्रीपासूनच ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता.

बाबा राघवदास रुग्णालयातला ऑक्सिजन पुरवठा गुरुवारीच बंद करण्यात आला होता आणि सिलिंडर शुक्रवारी संपले. मेंदूज्वर वॉर्डमधील रुग्णांना अँब्यू बॅगच्या आधारे ठेवण्यात आले.

मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळाजीपणामुळे अखेर ३० मुले दगावली. मेंदूज्वर विभागात मोठ्या सिलिंडरची कमतरता भासली होतीच. अशात लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठाही बंद झाला. त्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजनचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

या प्रकल्पाद्वारे गोरखपूर रूग्णालयातील ३०० रूग्णांना ऑक्सिजन पुरवला जात असे. मात्र, या ऑक्सिजनचे बिल थकल्याने लिक्विड गॅसचा पुरवठा बंद झाला.

मेंदूज्वर विभागाच्या वॉर्ड क्रमांक १०० मध्ये दर दीड तासाला ऑक्सिजनचे १६ सिलिंडर खर्च होत असतात. आज दुपारी १२ च्या दरम्यान सगळे सिलिंडरही संपले त्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

*