पालकांचे जातप्रमाणपत्र वैध असल्यास मुलांना पुनर्तपासणीचा अडथळा नाही

0

मुंबई । दि.11 । प्रतिनिधी-व्हॅलिडीटी असलेल्या पालकांच्या मुलांना यापुढे पुनर्तपासणीचा अडथळा येणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी आज विधानसभेत माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या विषयावर उत्तर देतांना दिले.

आदिवासी, मागास आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जातप्रमाण पत्र वैधता पुनर्तपासणी करावी लागते, त्यात अनेक अडथळे येतात. बर्‍याचवेळा पालकाच्या जातीचे प्रमाणपत्र वैध असते आणि मुलाचे अवैध ठरते ही समस्या आ.खडसेंनी अत्यंत मार्मिक शब्दांत मांडली.

आ.खडसे म्हणाले, आदिवासी, मागास व ओबीसी समाजातील पाल्यांची जातप्रमाणपत्रांची वैधता (व्हॅलिडीटी) कशासाठी तपासली जाते? जेव्हा पालकाकडे जात प्रमाणपत्र वैध आहे आणि त्याची तपासणी झालेली आहे, मग मुलाच्या जात प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याची गरज नाही.

जर पालकाचे जातप्रमाणपत्र वैध असेल तर मुलगा दुसर्‍या जातीचा कसा असेल? असा प्रश्न करुन आ. खडसेंनी विचारले, हा तर पितृत्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रकार आहे. यावर समाजकल्याणमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांनी बोलावे.

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे की, एकदा जात प्रमाणपत्र वैध ठरले तर रक्ताच्या नात्यातील पाल्यांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी होणार नाही.

आ.खडसेंच्या प्रश्नावर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत सांगितले की, प्रत्येक प्रकरणाची तपासणी करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. ज्यात शंका आहे त्याच प्रकरणांची पुनर्तपासणी केली जाते. यावर अनेकांनी आक्षेप घेतला.

त्यावर आ. खडसेंनी लक्षात आणून दिले की, विधीमंडळाच्या विधीसेवा समितीने या विषयावर मत व्यक्त केले असून वैध जात प्रमाणपत्र असलेल्या पालकांच्या पाल्यांची कागदपत्रे पुन्हा तपासण्याची आवश्यकता नाही अशी शिफारस केली आहे.

त्यावरही आदिवासी विकासमंत्री आपलाच मुद्दा पुढे रेटत होते. अखेर समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, जात प्रमाणपत्र तापसणीसंदर्भात अनेक तक्रारी आहेत.

नाथाभाऊ सांगत असलेली स्थिती खरी आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा आयोजनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आश्वासन दिले आहे की, यापुढे जात प्रमाणपत्र वैध असलेल्या पाल्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी पुन्हा केली जाणार नाही.

सरकार तसे आदेश लगेच देणार आहे. समाज कल्याणमंत्री कांबळे यांच्या विधानसभागृहातील आश्वासनानंतर यापुढे वैध जात प्रमाणपत्रे असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जात प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी टळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*