Type to search

अग्रलेख संपादकीय

पुन्हा रॅगिंगचा बळी !

Share

वैद्यकीय व्यवसाय हा ‘उमदा व्यवसाय’ (नोबल प्रोफेशन) म्हणून मानला जात असे. मात्र, अशा उमद्या व्यवसायात आता अनेक अनिष्ट गोष्टींनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या काळापासूनच त्याची सुरुवात व्हावी हे दुर्दैव! मुंबईतील ख्यातनाम नायर वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पायल तडवी नामक विद्यार्थिनीने नायर रुग्णालयातील तीन ज्येष्ठ महिला डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली. ही घटना सध्या राज्यभर गाजत आहे.

पायल ही जळगावची रहिवासी! ती पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत होती. पायलच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. दोन प्राध्यापकांनासुद्धा ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली गेली आहे. रॅगिंग करणार्‍या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आता फरार झाल्याच्या बातम्या आहेत. महाविद्यालयातील रॅगिंग प्रकाराविरुद्ध आता कायदासुद्धा आहे.

प्रवेश देतेवेळीच ‘रॅगिंग करणार नाही’ असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक विद्यार्थ्याकडून संबंधित महाविद्यालय लिहून घेते. तरीही कोणी असा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध चौकशी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरोधी समिती नेमण्यात आली आहे. नायर वैद्यकीय महाविद्यालयातील समितीकडे मात्र रॅगिंगसंबंधी कोणतीही तक्रार पायलने केली नव्हती, असे सांगण्यात येत आहे.

पायल आता हयात नाही. त्यामुळे तिने तक्रार केली होती की; नाही हे कसे समजणार? तिच्या आत्महत्येआधी तिची आई तिला भेटायला जळगावहून नायर रुग्णालयात आली होती. मात्र संशयित महिला डॉक्टरांनी भेटू दिले नाही, वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक छळ होत असल्याचे पायलने फोन करून सांगितले होते, असे तिच्या आईचे म्हणणे आहे.

एकूणच नायर रुग्णालयातील हे प्रकरण सरळ-साधे दिसत नाही. अशा प्रकरणांचा तपास तातडीने व्हायला हवा. अन्यथा रुग्णालयाच्या सर्व सेवांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रुग्णसेवा खंडित होऊ शकतात. म्हणून पोलिसांनी तातडीने हालचाली करून या प्रकरणाचा छडा लावायला हवा. डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी पाच वर्षांनंतर परवा दोन जणांना सीबीआयने अटक केली आहे.

मात्र ही अटक एकाने रेकी केल्याबद्दल व दुसर्‍याने पुरावा नष्ट केल्याबद्दल आहे. म्हणजे मूळ गुन्ह्यातील तपास अजून दूरच आहे. त्यांचे मारेकरीही अजून तरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाभोळकर प्रकरणाप्रमाणे नायर रुग्णालयातील पायल तडवी आत्महत्येचे प्रकरणसुद्धा रेंगाळू नये एवढीच जनतेची अपेक्षा असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!