Type to search

मुख्य बातम्या राजकीय

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची राहुल गांधीची तयारी

Share

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. राहुल गांधी यांनी अद्याप औपचारिकरित्या राजीनामा सादर केलेला नाही, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत.  राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे.

सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता

. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतते अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. राहुल गांधी यांनी बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. पण कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही,

कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करताना राजीनाम्याची तयारी दाखवली. यानंतर प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांसमोर राजीनाम्याची तयारी दर्शवली.

मात्र, दोघांनीही राहुल गांधी यांना राजीनामा देऊ नये, असा सल्ला दिला. तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही, निवडणुकीत जय- पराजय होत राहतो, असे मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांना सांगितले.

या चर्चेची कुणकुण काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्यांना लागली होती.  बैठक सुरु होताच कार्यकारिणीमधील सदस्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे सांगितले.  राहुल गांधी यांनी प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच कार्यकारिणीने त्यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!