Type to search

Breaking News मुख्य बातम्या राजकीय

सतराव्या लोकसभेतील मोदी मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे

Share

नवी दिल्ली  :  सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड केली जाण्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्या बरोबरीनेच लोकसभा अध्यक्षपदासाठी मावळते पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही नाव चर्चेत आहे. अर्थात या दोन नावांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षपदासाठी आश्चर्याचा धक्का देणारे नाव पुढे करू शकतात, असे म्हटले जात आहे. मोदी मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांचे खंदे समर्थक आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार अमित शहा यांना एक तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. शहा गृहमंत्री झाल्यास राजनाथ यांना लोकसभा अध्यक्षपदी बसविले जाण्याची शक्यता आहे.

मात्र, शहा यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले, तर लोकसभेचे अध्यक्षपद शांत, तटस्थ स्वभावाच्या, पण भाजपशी बांधिलकी असलेल्या डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविले जाऊ शकते. अर्थात मोदींच्या मनात आणखी कोणते नाव असेल याचा अंदाज लावता येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोदींच्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये अमित शहा यांचा समावेश निश्चित असून मावळते अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे भवितव्य अधांतरी मानले जाते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड होणार असेल, तर मूळच्या चार अव्वल मंत्र्यांपैकी केवळ संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचेच स्थान निश्चित मानले जाते.स्वराज यांनी लोकसभा निवडणूकच लढली नसल्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान डळमळीत झाले आहे.

पण राज्यसभेवर निवडून आलेले अमित शहा लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सुषमा स्वराज यांना निवडून आणून परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवणे शक्य आहे. अन्यथा परराष्ट्र मंत्रिपदी निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करुन संरक्षण मंत्रीपदासाठी सुरेश प्रभू यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तीच खाती कायम ठेवली जाण्याची शक्यता असून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जगतप्रकाश नड्डा, रवीशंकर प्रसाद, राज्यवर्धन राठोड आणि मुख्तार अब्बास नकवी यांचीही पूर्वीचीच खाती कायम ठेवली जातील अशी चर्चा आहे.

राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना कोणती बढती मिळते याकडेही लक्ष लागलेले आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळू शकते किंवा बिजू जनता दलाचे भ्रातृहरी महताब यांच्या नावाला भाजप आणि विरोधी पक्षांचेही समर्थन मिळू शकते.

महाराष्ट्रातून आठ मंत्री? 

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपच्या पाच, तर शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातून अनुप्रिया पटेल यांच्यासह आठ मंत्र्यांचा, तर बिहारमधून पूर्वीच्याच मंत्र्यांसह जनता दल युनायटेडच्या दोन मंत्र्यांचा समावेश अपेक्षित आहे.

अन्य राज्यांचे प्रतिनिधित्व पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असले तरी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून त्यात अनुराग ठाकूर, तेजस्वी सूर्या या तरुण नावांची चर्चा आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जगतप्रकाश नड्डा आणि भूपेंद्र यादव ही दोन नावे चर्चेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!