Type to search

आवर्जून वाचाच जळगाव फिचर्स राजकीय विशेष लेख

जादू मोदींची! लाट विकासाची!!

Share

खान्देशातील चारही मतदारसंघातील भाजपाच्या देदीप्यमान घोडदौडीचे विश्लेषण करायचे झाल्यास उमेदवारांपेक्षा विकास आणि कणखर नेतृत्वाचीच जोरदार लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षात सुरु झालेली विकासकामे, देश सुरक्षित हातात कायम ठेवण्याची भावना हेच मुद्दे प्रभावी ठरले आहेत. खान्देशात शतप्रतिशत यश मिळाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे दिल्ली दरबारातील वजन आणखीच वाढणार आहे.

यावेळी भाजपांतर्गत पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात लाथाळ्या पहायला मिळाल्या. नंदुरबारात विद्यमान खासदार डॉ हिना गावीत यांचे तिकीट कापण्याची जोरदार चर्चा होती. अखेर शेवटच्या दिवशी डॉ. गावीतांची उमेदवारी निश्चित झाली. भाजपाचेच नेते डॉ.सुहास नटावदकर शेवटपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्नशिल होते. अखेर त्यांनी बंडखोरी केली. डॉ.हीना गावित यांनी मराठा आंदोलनकर्त्यांबाबत व धनगर आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा आणि आदिवासी समुदाय त्यांच्यावर नाराज असल्याचे वातावरण तयार केले गेले, प्रत्यक्षात मतदानातून ते दिसून आले नाही. निवडून आल्यावर मुंबईवासी होणार्‍या काँग्रेसच्या अ‍ॅड.के.सी.पाडवींना जनतेने साफ नाकारले आहे. बंडखोर नटावदकरांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाल्याने त्यांच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरपूर तालुक्यातूनही डॉ.हीना गावितांना मताधिक्य मिळाल्याने येणार्‍या विधानसभेच्या निकालावरही दूरगामी परिणाम करणारे आहे.

धुळ्यात तर तीन महिन्यापूर्वीच महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली होती. सपाटून मार खाल्लेल्या भाजपाच्याच अनिल गोटे यांनी पुन्हा संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरेंना आव्हान दिले होते. डॉ.भामरेंना पाडण्यासाठी गोटेंनी दोन दशकांची दुष्मनी विसरुन शरद पवारांच्या घरी पायधुळ झाडली होती. डॉ.भामरेंवर शिवसेनाही नाराज होती. काही शिवसैनिकांनी उघड पत्रक काढून भामरेंना विरोध दर्शविला होता. नाते-गोते, जातीपातीचे राजकारण, धुळ्यात असलेल्या शैक्षणिक संस्थांचे जाळे, मालेगावातून एकगठ्ठा मतांची असलेली आशा यामुळे काँग्रेसच्या आ.कुणाल पाटील यांना बरे वातावरण वाटत होते.

मात्र मालेगाव मध्य सोडता आ.कुणाल पाटलांना कुठेही वर्चस्व मिळवता आलेले नाही. त्यांच्याच धुळे ग्रामीण मतदारसंघातूनही भाजपालाच मताधिक्य मिळाले आहे. धुळ्यात यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस एकसंघ वावरत होती, पण ते मतदानातून दिसून आले नाही. गोटेंनी वातावरण तापवायचा प्रयत्न केला पण मतदारांनी त्यांच्याकडे करमणूक म्हणूनच पाहिल्याचे स्पष्ट झाले. त्यांना अवघे आठ हजार मते मिळाली आहेत. ज्या धुळ्याचे ते प्रतिनिधीत्व करीत होते तेथून त्यांना फक्त तीन हजार मते मिळाली आहेेत. डॉ.भामरे यांचे धुळ्यातील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.


जळगाव मतदारसंघात भाजपांतर्गत गटबाजीचा कहर होता. मावळते खासदार ए.टी.नाना पाटील यांचे तिकीट कापले गेले. आ स्मिता वाघांनी उमेदवारी अर्जही भरला, नंतर आ.उन्मेश पाटलांची उमेदवारी ऐनवेळी घोषित झाली. अमळनेरच्या राड्यामुळे राज्यात भाजपाची बदनामी झाली. मंत्र्यांसमोर आजी-माजी जिल्हाध्यक्षांत हाणामारी झाली. उलट गुलाबराव देवकरांना आधीच राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी प्रचारही सुरु केला होता. देवकरांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचे पालूपद गायले तर उन्मेश पाटील यांनी मोदी एके मोदीचा मंत्र जपला.

या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. युतीच्या एकूणच संघर्षामुळे नेत्यांमध्ये मनोमिलन झाले ते शिवसैनिकांपर्यंत झिरपेल का, अशीही शंका घेतली गेली. मात्र ना.गुलाबराव पाटील, आ.किशोरआप्पा पाटील व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केलेले परिश्रम निकालातून उमटले आहेत. देवकर दिल्लीत गेले तर गुलाबराव पाटलांचा मुंबईतील मार्ग सोपा होईल, या गृहितकातूनही काही अंदाज बांधले गेले. मात्र शिवसेनेने मनापासून भरभरुन भाजपासाठी काम केल्याचे स्पष्ट झाले.

जळगावातील निकाल अतिशय अटीतटीचा लागेल अशी अटकळ असतांना ए.टी.नानांपेक्षाही लाखभर अधिक मतांनी उन्मेश पाटलांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात सुक्ष्म नियोजन आणि निवडणुकीसाठी वाट्टेल ते करण्याची ना.गिरीश महाजनांची धडपड सफल झाली आहे.

रावेरमधील लढत भाजपासाठी तुलनेने सोपी होती. ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसेंचा हा गड. एकेकाळी राज्याचे नेतृत्व करणार्‍या नाथाभाऊंना तब्बेतीमुळे केवळ रावेरमध्येच अडकून पडावे लागले. नाथाभाऊ जळगाव मतदारसंघामध्येही आले नाहीत, त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. खडसेंच्या नाराजीचे उट्टे त्यांचे समर्थक काढतील अशी अटकळही फोल ठरली. खा.रक्षा खडसे यांनी गेल्या पाच वर्षात केलेला लोकसंग्रह आणि विकासाचे राजकारण त्यांची निवड सुलभ करुन गेला. रावेरमधून काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली लढत उल्लेखनीय आहे.

ऐनवेळी तिकीट मिळूनही डॉ.पाटलांनी तीन लाखांवर मजल मारली. रक्षा खडसेंचे तिकीट कापण्याची चर्चा, पाडापाडी होण्याची भीती असतांना प्रत्यक्षात तसे झाले नाही. आ.एकनाथराव खडसेंच्या प्रभावी नियोजनामुळे रक्षा खडसेंचा विजय सुकर झाला. ना.गिरीश महाजनाचे जामनेर रक्षा खडसेंच्या रावेर मतदारसंघात येते. त्यामुळे जामनेरमध्ये काय होते याची उत्सुकता होती.

रावेरच्याच सभेत ना. महाजनांनी रक्षा खडसेंना मुक्ताईनगर पेक्षा अधिक मतधिक्य जामनेर मधून मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यासाठी आ.खडसेंकडे पार्टी देण्याची मिश्किल मागणीही केली होती. ना.महाजनांनी रक्षा खडसेंना लाखावर मते तर दिलीत मात्र मुक्ताईनगरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देऊ शकले नाहीत, त्यामुळे ना.महाजन आता आ.खडसेंकडून पार्टी मागू शकणार नाहीत!

लोकसभेची निवडणूक देशाच्या प्रश्नांवर लढली जाते, ही निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. मतदारांनी उमेदवारांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाला भरभरुन दिले. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे आणि जगभरात ताठ मानेने उभा आहे ही भावनाच महत्वाची ठरली. कोण्या पक्षापेक्षा विकासाची लाट मतदारांमध्ये होती, ती मतदानातून दिसली. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांची कामे सुरु आहेत. तरसोद ते अमरावती चौपदरी महामार्ग, जळगाव-पाचोरा-भडगाव-चाळीसगाव-नांदगाव महामार्ग, जळगाव ते औरंगाबाद महामार्गाची कामे जोरात सुरु आहेत.

जळगाव, भुसावळात अमृत योजनेचे काम सुरु आहे. ही कामे मतदारांना भावली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकर्‍यांना शेतकरी सन्मान योजनेचा पैसा खात्यात मिळाला. एव्हाना हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे मारण्याची सवय असणारा शेतकरी राजा विनासायास अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘सन्माना’मुळे सुखावला. तरुणाईत तर केवळ आणि केवळ मोदींची क्रेझ होती. तरुण वर्ग विरोधकांचे ऐकूण घ्यायलाही तयार नव्हता. मतदानातून तरुणाईचा विश्वासही दिसून आला.

या निकालाचे परिणाम येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याने पाडापाडीचे उद्योग कोणीही केल्याचे दिसले नाही. मुळात राजकीय पक्षाच्या नेत्यांचे कुणी ऐकलेच नाही, प्रचार निष्प्रभ ठरला कारण बहुसंख्य जनतेने निर्णय घेतला होता. मतदानातून त्याची अंमलबजावणी झाली इतकेच.

उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांची जबाबदारी गिरीश महाजनांकडे होती. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक महाजनांनी विश्वास सार्थ ठरवला आहे. अत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर विजय मिळवून महाजनांनी शब्द पाळला आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी त्यांचे वजन निश्चित निर्विवादपणे अजून वाढणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!