Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय

Share

पुणे | प्रतिनिधी :   पुणे लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित असलेल्या भाजपने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवला.

या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा दारूण पराभव केला. गिरीश बापट यांना ६ लाख १० हजार १६४ मते, तर मोहन जोशी यांना २ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या बापट यांचा तब्बल ३ लाख १४ हजार २९६ मतांनी एकतर्फी विजय झाला.

या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना ६३ हजार ४४ मते पडली. तसेच १० हजार ६०२ पुणेकर मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा शंभर टक्के पराभव होणार अशा वल्गना करणाऱ्या भाजपला पवार घराण्याने धडा शिकवला. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला. सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते, तर भाजपच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली.

त्यामुळे सुळे या १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी विजयी झाल्या. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांना ४४ हजार १३४ मते पडली. तसेच ७ हजार ८६८मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

मावळ

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला. श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते, तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ मते पडली. तसेच १५ हजार ७७९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

शिरूर

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा विजयरथ यंदा राष्ट्रवादीने रोखला. चौथ्यांदा खासदार होण्याचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वप्न राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी धुळीस मिळवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत विजयी झालेले आढळराव पाटील यंदा ५८ हजार ४८३ मतांनी पराभूत झाले.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते, तर राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांना ६ लाख ३५ हजार ८३० मते मिळाली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना ३८ हजार ७० मते पडली. तसेच ६ हजार ५१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!