पतसंस्था संचालक, अधिकार्‍यांची ईडीमार्फत चौकशी

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील पतसंस्था अडचणीत येण्यासाठी जबाबदार असलेले तत्कालीन संचालक मंडळ यांच्यासह तत्कालीन अधिकार्‍यांची ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान विभागीय आयुक्त झगडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा सहकार विभाग कामालाही लागला आहे.
संचालक आणि तत्कालीन अधिकार्‍यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे जिल्ह्यातील पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे सहकार चळवळ पुर्णत: मोडकळीस आली होती.

गैरव्यवहार करणार्‍या तत्कालीन संचालक मंडळासह काही अधिकार्‍यांवर गुन्हेही दाखल झाले. पण पुढील कार्यवाही झाली नाही.

पतसंस्थांच्या गैरव्यवहारासंबंधी दि. 10 जुलै रोजी विभागीय स्तरावर झालेल्या लोकशाही दिनात गंभीर चर्चा करण्यात आली.

पतसंस्था अडचणीत येण्याबाबत ‘मनी लाँड्रींग’चाही संशय व्यक्त करण्यात आल्याने विभागीय आयुक्त झगडे यांनी अशा पतसंस्थांची, तत्कालीन संचालक मंडळ आणि तत्कालीन अधिकार्‍यांची चौकशी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्याची सुचना केली.

या सुचनेनुसार विभागीय सहनिबंधकानी जिल्हा उपनिबंधकांना याबाबत पत्र पाठवून संबंधीत पतसंस्थांचे संचालक मंडळ, कर्ज प्रकरणे, तत्कालीन अधिकार्‍यांची माहिती मागविली आहे.

महिनाभरात ही माहिती विभागीय कार्यालयाला कळविली जाणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 100 पतसंस्था अडचणीत आहेत.

आता ईडी खात्यामार्फत चौकशी होणार असल्याकारणाने ठेवीदारांना न्याय मिळण्याची नवी आशा पल्लवीत झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पतसंस्थांमध्ये असलेल्या ठेवींसाठी ठेवीदार लढा देत असून त्यांच्या लढ्याला या निर्णयामुळे अधिक बळ मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*