Type to search

maharashtra आवर्जून वाचाच फिचर्स

घवघवीत यशाचा अन्वयार्थ

Share

लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशभरामध्ये सुप्त स्वरुपात मोदी लाट किंवा स्वतः पंतप्रधान म्हणत असत त्याप्रमाणे प्रो-इन्कम्बसी वेव्ह होती हे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मिळालेल्या घवघवीत यशामुळे स्पष्ट झाले आहे. भारतीय स्वातंत्रोत्तर काळातील राजकीय पक्षांची वाताहत पाहता भारतीय जनता पक्षाने टिकवलेले ऐक्य आणि वाढवलेले संघटन याला तोड नाही. भाजपाच्या घोडदौडीच्या तुलनेत कॉंग्रेस, डावे पक्ष आणि साम्यवादी पक्ष हे गलितगात्र झाले आहेत.

सतराव्या लोकसभेसाठी झालेली सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीचे ऐतिहासिक निकाल हे भारतीय राजकारणाला नवे वळण देणारे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर देशाच्या सर्व भागातील-स्तरातील मतदारांनी दाखवलेला विश्‍वास हा अनेक राजकीय निरीक्षकांना-अभ्यासकांना आणि विश्‍लेषकांना अंचबित करणारा ठरला आहे. मतदानोत्तर चाचण्यांमधून या निकालाचा अंदाज पुरेसा स्पष्ट झाला होता;

मात्र गेली पाच वर्षे जनतेच्या मनात सातत्याने संभ्रम आणि भीती करणार्‍या विरोधी पक्षांनी एक्झिट पोलवर संशय व्यक्त करतानाच पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उकरून काढला होता. इतकेच नव्हे तर सरकार स्थापनेसाठीच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. तथापि, निकालानंतर विरोधी पक्षांना सणसणीत चपराक बसली आहे. कर्नाटक, ओडिसा, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय आणि एकंदरीतच भाजपाची वाढलेली मतांची टक्केवारी ही या पक्षाविषयी आणि पक्षनेतृत्त्वाविषयी जनमानसात असणार्‍या विश्‍वासाची पोचपावती आहे.

अमेरिकेतील ङ्गिलाडेल्ङ्गिया विद्यापीठातील ङ्ग्रेंड डेक्स्टर या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाने द जनसंघ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात जनसंघाने भारताला कशी पर्यायी राजकीय संस्कृती दिली याबद्दल विश्‍लेषण केले आहे. अनुशासित, शिस्तबद्ध आणि संस्कार असलेला आणि भ्रष्टाचार, असंतुलनापासून दूर असलेला एक राजकीय पक्ष भारतात उदयास येत आहे आणि उद्याच्या भारताचे भविष्य या पक्षांच्या धुरिणांकडे असेल असे भाकित त्यावेळी अनेक अमेरिकन पत्रकारांनी व्यक्त केले होते आणि ते पुढे सिद्धीस आले आणि प्रत्यक्षात घडून आले.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे समर्थ नेतृत्व पाहून भरभरून मते दिली आणि दोन तृतीयांश मतांनी भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांसह निवडून आला. इतर पक्षांनाही भाजपने सत्तेत सामावून घेतले. भाजप स्वतःच्या क्षमतेवर दोन तृतीयांश मतांनी सत्तेत येईल यावर कोणाचाही विश्‍वास नव्हता, पण असा इतिहास घडला. दोन वर्षांपूर्वीच मिशन ३५० घेऊन अमित शहा यांनी २०१९च्या निवडणुकीसाठी संघटनेला दिशा देण्यास सुरुवात केली होती. या प्रयत्नांना अभूतपूर्व यश आल्याचे ताज्या निवडणूक निकालांमधून दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रात शून्य भ्रष्टाचार हे धोरण राबवले. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा ठपका आला नाही हे मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वाचे यश होय. रिङ्गॉर्म, परङ्गॉर्म आणि ट्रान्सङ्गॉर्म म्हणजेच सुधारणा, कृती आणि परिवर्तन घडवा या त्रिसुत्रीचे पालन करून त्यांनी प्रशासनाला सुशासनाला नवी दृष्टी दिली आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकांमध्ये एक विश्‍वास निर्माण केला आणि जनसंघाची जी पर्यायी राजकीय संस्कृती होती ती त्यांनी कृतीत आणली.

नरेंद्र मोदी यांचे प्रभावशाली नेतृत्त्व एनडीएची शक्ती वाढवणारे ठरले. नीतिशकुमार यांनी त्यांना दिलेला पाठिंबा, उत्तर प्रदेश विधानसभेत मिळवलेले दोन तृतीयांश बहुमत आणि सर्वच राज्यातील लोकांनी दिलेला मतरुपी प्रतिसाद हे पाहता नरेेंद्र मोदी यांचा करिश्मा सतत वाढत असल्याचे दिसून आले होते. आता लोकसभा निवडणूक निकालांनी मोदी करिष्म्यावर पुनश्‍च शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा देऊन जगभरात भारताची मान समर्थपणाने उंचावण्यामध्ये मोदी यशस्वी ठरले. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या प्रभाव क्षमतेतून २०१९ मध्ये जबरदस्त विजय मिळणार, हा आत्मविश्‍वास अमित शहा यांना होताच आणि तो सार्थ ठरला.

विजयाची मिमांसा

सत्तेत आल्यानंतर बहुतेक वेळा पक्ष ढेपाळतात, पक्ष कार्यालये बंद होतात आणि पोटपुजा सुरु होते. परंतु भाजपाने एक पक्ष म्हणून संघटित करण्यासाठी जनसंघाच्या पद्धतीनेच काम करायला सुरुवात केली. पक्षाचे मेळावे, संघटन, कार्यकर्त्यांवर करायचे संस्कार या कोणत्याही बाबतीत पक्ष थांबला नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या संघटन चातुर्यामुळे आणि पक्षबांधणीमुळे भारतीय जनता पक्ष ङ्गक्त कागदावर नसून केडर पक्ष म्हणून प्रभावाशाली आहे ही गोष्ट सिद्ध झाली आहे.

पूर्वीच्या काळी लोक बर्‍याचवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच भारतीय जनता पक्षाची किंवा जनसंघाची मदार आहे असे समजत असत. भारतीय जनता पक्षाविषयी संघाला सहानुभूती असली तरीही संघ म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा उलट असे सूत्र किंवा समीकरण संघाने कधीही मांडलेले नाही. भाजपाच्या राजकीय ध्येयधोरणास संघ नैतिक पाठिंबा देत असला तरी सर्वच धोरणे, कार्यपद्धती यांच्यावर संघाचे नियंत्रण आहे असे नाही.

कॉंग्रेस पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर केडर आणि कार्यकर्ते या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. अलीकडे कम्युनिस्ट पक्षाचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत गेले आहे. त्यामुळे स्वातंत्रोत्तर काळात भारतातील राजकीय पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पहायला मिळाले. नरेंद्र मोदी यांनी जनसंघाचा नेता म्हणून भारतीय जनता पक्षाला एक प्रभावी राजकीय नवी संस्कृती दिली आहे. या संस्कृतीतून नव्या कार्यकर्त्यांचा, नव्या नेत्यांचा संच भारतीय जनता पक्षात तयार झाला आहे.

अलीकडील काळात अनेक जणांनी नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि इंदिरा गांधी यांचा करिश्मा यांची तुलना केली; पण पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची ध्येयधोरणे कौटुंबिक हिताला प्राधान्य देणारी होती. मात्र नरेंद्र मोदी यांचे ध्येयधोरण हे देशासाठी समर्पित होणारे आहे. २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील आणि महात्मा गांधीजींच्या १२५ व्या जयंतीचा तो कालावधी असेल अशा काळात भारताला एक बलशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प करून एक नवभारताच्या निर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्याच संकल्प त्यांनी केला. भारतीय स्वातंत्रोत्तर काळातील राजकीय पक्षांची वाताहत पाहता भारतीय जनता पक्षाने टिकवलेले ऐक्य आणि वाढवलेले संघटन याला तोड नाही. समाजवादी पक्षाची आणि जनता दलाची एवढी शकले झाली की शब्दही अपुरे पडतील. हीच गोष्ट साम्यवादी पक्षाची झाली. त्यांचीही तीन चार शकले झाली.

अशाच प्रकारची वाताहत रिपब्लिकन पक्षाचीही झाली. मात्र स्वातंत्रोत्तर काळात सर्व प्रकारची संकटे आणि आव्हाने स्वीकारून आपले पक्षसामर्थ्य आणि वैचारिक आणि नैतिक आचरण जास्तीत जास्त चांगले ठेवून लोकांच्या विश्‍वासास पात्र राहाण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास धोरणामुळे, सर्वसमावेशक तंत्रामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष नजीकच्या दशकात वाढेल हे या निकालांनी दाखवून दिले. त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल सारख्या प्रांतातही भाजपने केलेली कामगिरी ही विरोधी पक्षांना धक्कादायक ठरणारी ठरली.

नजीकच्या भविष्यात भारतीय जनता पक्षाला प्रभावी अशी राजकीय रचना करावी लागणार आहे. त्यासाठी तालुकापातळीपर्यंत पक्ष कार्यालये प्रत्येक गावोगावी पक्ष संघटन अनुशासित कार्यकर्त्यांचा चमू आणि शुद्ध, स्वच्छ चारित्र्यावर आधारलेला पक्ष याचा विचार करता त्यांच्या वैशिष्ट्यांचे जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मराठवाडा या दैनिकाचे संपादक अनंत भालेराव यांनी भाजपच्या स्थापनेनंतर एक अग्रलेख लिहीला होता. त्याचा मथळा त्यांनी भाजपने जनसंघत्व टिकवावे असा होता. या अग्रलेखाचे सार असे की भारतीय जनता पक्ष हा भगवी कॉंग्रेस होऊ नये. या पक्षाने जनसंघाची राजकीय संस्कृती, त्यातील शिस्त, अनुशासन आणि चारित्र्य ह्या तीन महत्त्वाच्या पैलूंवर भर देऊन आपली वाटचाल चालू ठेवावी तर हा पक्ष देशामध्ये वेगळी राजकीय संस्कृती देऊ शकेल असा त्यांच्या चिंतनाचा सूर होता. नरेंद्र मोदी यांचे यश त्यातच आहे कारण त्यांनी भाजपाचे जनसंघत्व टिकवले आहे.

भाजपाच्या घोडदौडीच्या तुलनेत कॉंग्रेस, डावे पक्ष आणि साम्यवादी पक्ष हे गलितगात्र झाले आहेत. त्याची कारणमीमांसा करता असे दिसते की कॉंग्रेस पक्षाकडे संघटित कार्यकर्त्यांचा वर्ग नाही. संस्कारित कार्यकर्त्यांची पिढी जी १९६० पर्यंत कॉंग्रेसमध्ये होती ती हळूहळू निस्तेज होत गेली. तीच अवस्था समाजवादी पक्षाची. राममनोहर लोहिया यांचा आदर्श घेऊन त्यांच्या वैचारिक सिद्धांतावर आणि ध्येयधोरणावर निखळ श्रद्धा ठेवून काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा संच बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात होता. पण या पक्षात नेते अधिक कार्यकर्ते कमी अशी अवस्था झाली. त्यामुळे पक्षाची शकले झाली. छोट्या कारणांवरून मतभेद होऊन परस्परांमध्ये विभाजन आणि सिद्धांताचा अभाव या कारणामुळे समाजवादी पक्षाचे तुकडे झाले.

हीच गोष्ट भारतातील साम्यवादी पक्षाचीही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डांगेवादी आणि माकप असे दोन गट पडले. त्यानंतर माओवादी, लेनिनवादी वेगळे झाले. म्हणजे साम्यवादाचे तत्वज्ञान घेऊन निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा गट या पक्षातून हळूहळू दूर होत गेला आणि आज त्या पक्षाला केवळ पुढार्‍यांचा पक्ष म्हणावे अशी अवस्था झाली आहे. उत्तर प्रदेशात बुवा-भतिजा यांनी एकत्र येत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला; पण त्याला अत्यल्प यश आले. याबाबत चिंतन करण्याची गरज आहे. भारतातील इतर छोट्या पक्षांचीही अशीच अवस्था दिसून येते.

काही राज्यांमध्ये तर प्रादेशिक पक्षांची वाटचाल सुरळीत होऊ शकली नाही; काहींची अखिल भारतीय वाटचाल प्रश्‍नांकित आहे. त्यामुळे एकीकडे सर्वदूर पसरत असलेला भारतीय जनता पक्ष आणि दुसरीकडे ध्येयधोरणे आणि समान कार्यक्रम, विचारसरणी आणि केवळ मोदीविरोधाने ग्रासलेले विरोधी पक्ष असे विषम चित्र आहे. हे चित्र राजकीय असमतोलाचे चित्र आहे.

कुठल्याही देशात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात रथचक्रासारखी अवस्था असली पाहिजे. रथाची वाटचाल होण्यासाठी जशी दोन समतोल चाके असावी लागतात तशी चाके लोकशाहीतही समतोल असावी लागतात. इंग्लंडमध्ये मजूर आणि हुजूर किंवा अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्ष यांची वाटचाल पाहता भारतामध्येही कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी अमेरिकेप्रमाणे प्रभावशाली व राजकीय परिणाम घेऊन आपले कार्य केले पाहिजे आणि परस्परांना समजून घेऊन राजकीय व्यवस्था कायम ठेवली पाहिजे.

तसे झाले तरच भारतात लोकशाही व्यवस्था मजबूत होईल, लोकशाही जीवनाचा मार्ग होईल. उजवे, डावे, मध्यममार्गी यापेक्षाही सर्वांत महत्त्वाची गोष्ट देश व देशहित हे आहे आणि राजकीय पक्ष शेवटी देशाचे कल्याण साधणारे असतात ही गोष्ट विसरता कामा नये.

 

– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

(लेखक त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु आहेत.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!