Type to search

आवर्जून वाचाच फिचर्स राजकीय

पुन्हा मोदीच का ?

Share

समाजाच्या अगदी तळाच्या लोकांनाही आपलेसे करता येतील असे अनेक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत घेतले. त्यामुळे भाजपाला एरवी अपेक्षित नसलेल्या वर्गातूनही जोरदार पाठींबा मिळालेला दिसला. गेल्या काही वर्षार्ंत भाजपाला पक्ष म्हणून मिळणारे समर्थनही वाढते दिसलेे. पक्षाच्या कमिटेड मतदानात वाढ होत आहे. हे बांधील मतदान असेच वाढत गेले तर भाजपाचा प्रभाव कमी करणे कोणालाच शक्य होणार नाही याची विरोधकांना जाणीव होत आहे आणि मोदी नावाचा हा झंझावात कसा रोखावा या प्रश्नाने ते त्रस्त झाले आहेत. पण त्यांच्या विरोधकांत त्यांची बरोबरी करू शकेल असा एकही नेता आजतरी दिसत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, आपल्या विरोधकांची एक फार मोठी चूक दाखवून दिली. या लोकांनी मोदी हा माणूस नेमका कसा आहे याचा नीट अभ्यासच केलेला नाही असे ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्यात तथ्य आहेे. मोदींच्या विरोधकांना मोदी खरेच कळलेले नाहीत. त्यांचे मोदींच्या बाबतीत काही भ्रम होते आणि अजूनही आहेत. त्यांच्या मते मोदींनी मुख्यमंत्री असताना गुजरातेत जे काही विकास कार्य केले त्याची अमाप प्रसिद्धी करून स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समोर आणले आहे. ही तिकडमबाजी गुजरातपुरती ठीक होती; पण पूर्ण देशाचा कारभार करताना त्यांना हे जमणार नाही, पंतप्रधान म्हणून काम करताना ते काही तरी चुका हमखासपणे करतील आणि त्यांचे भांडवल करून आपल्याला पुन्हा सत्ता संपादित करता येईल असा विरोधकांचा कयास होता. तो फोल ठरला आहे.

सध्या राजकारणाची शैलीच अशी काही झाली आहे की, कोणताही पक्ष आपली संघटनशक्ती वाढवण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधारी पक्षातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून त्याच्या भांडवलावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून कॉंग्रेस नेते भाजपाच्या सरकारचे भ्रष्टाचार शोधण्याचा प्रयत्न हरतर्‍हेने करीत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर असे काही नियंत्रण ठेवले आहे की, कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला एका पैशाचाही भ्रष्टाचार करता येऊ नये. या नियंत्रणामुळे मोदी यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप झाला; पण त्याची पर्वा न करता त्यांनी भ्रष्टाचारमुक्तीची पाच वर्षे दिली.

याच काळात ज्या राज्यांत भाजपाची सरकारे आली त्याही सरकारांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार केला असून कोणत्याही राज्यात भ्रष्टाचाराचा फारसा बोभाटा झालेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपाची आणि स्वत:ची, भ्रष्टाचारापासून दूर राहणारा पक्ष किंवा नेता, अशी प्रतिमा निर्माण करता आली. ही प्रतिमा नेमकी कॉंग्रेसच्या विरुद्ध आहे. तिचा फायदा भाजपाला नक्कीच झाला आहे. मात्र ही प्रतिमा निर्माण करताना मोदींनी स्वत:ला भ्रष्टाचारापासून दूर ठेवले आहे.

पदाचा वापर करून अमाप पैसा कमावणार्‍या सर्वसाधारण नेत्यापेक्षा ते वेगळे आहेत. मोदी २००२ पासून सत्तेत आहेत पण त्यांनी सत्तेचा वापर करून आपल्या एकाही नातेवाईकाला पैसा कमावण्याची संधी दिलेली नाही आणि कोणा नातेवाईकाला सत्तेच्या आसपासही फिरकू दिलेले नाही. कोणा नातेवाईकाची तशी चर्चाही झालेली नाही. मोदींनी हा आदर्श निर्माण केला आहे आणि त्यांच्याशी याबाबत कोणीही बरोबरी करू शकत नाही.

मोदींच्या विरोधकांचा २०१९ च्या निवडणुकीबाबत एक अंदाज चुकला आहे. १९९९ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपाच्या वाजपेयी सरकारला दुसर्‍यांदा सत्ता प्राप्त करता आली नाही तसे मोेदीही दुसर्‍यांदा सत्ता प्राप्त करण्यात अपयशी ठरतील, असा त्यांचा अंदाज होता. मोदी घेतील तो प्रत्येक निर्णय अंगलट येईल अशी त्यांची कल्पना होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदींच्या सगळ्या नव्या कल्पनांची टिंगल टवाळी केली. नोटबंदीची तर फारच अतिशयोक्त वर्णने केली. नोटबंदीने १५० लोक मेले. हजारो कारखाने बंद पडले. देश मागे गेला. हा देशातला सर्वात मोठा गैरव्यवहार आहे.

या निर्णयाने लाखो लोक बेकार झाले असे काही बाही म्हटले. हा निर्णय अंगलट येईल आणि जनता त्यांच्यावर नाराज होईल असा विरोधकांचा तर्क होता पण तसे घडले नाही. जनतेने नोटबंदीचे स्वागतच केले. नोटबंदीने सामान्य माणसाला काही त्रास झाला नाही. ज्याच्याकडे काळा पैसा होता त्यांनाच त्रास झाला आणि नोटबंदीच्या विरोधात बोलणारे तेच आहेत हे लोकांच्या लक्षात आले.

अटलबिहारी वाजपेयींनी शायनिंग इंडिया ही जाहिरातीची थिम ठरवली होती; पण ती लोकांना आवडली नाही. परिणामी २००४ मध्ये सरकारला पायउतार व्हावे लागले. वस्तुत: तेव्हा भाजपाचा काही फार दारुण पराभव झाला नव्हता आणि त्याच्या विरोधात कॉंग्रेसलाही काही फार देदीप्यमान यश मिळालेले नव्हते. २००४ ची पक्षस्थिती पाहता असे लक्षात येते की, तेव्हा भाजपाला १३७ जागा मिळाल्या होत्या आणि कॉंग्रेसला १४३ जागा मिळाल्या होत्या. दोन्हीतले अंतर केवळ सात जागांचे होते. मात्र शेवटी पराभव तो पराभव. भाजपाला सत्तेचा वापर करून जनतेच्या हृदयात इंदिरा गांधीसारखे अढळ स्थान प्राप्त करता आले नाही.

अटलजींनी सामान्य माणसाचे जीवन बदलून जाईल असा ऐतिहासिक निर्णय घेतला नाही. त्यांच्याविषयी कितीही आदर असला तरीही त्यांच्या कारभारातील ही उणिव त्यांना भोवली असे म्हणावे लागेल. त्यामागे काही कारणेही आहेत. भाजपाचे मध्यमवर्गीय नेतृत्व, त्यांच्या मनात असलेली शेतकरी आणि गरीब जनतेच्या समस्यांविषयीची उदासीनता ही त्याची मुख्य कारणे होती. पण मोदी तसे नाहीत. त्यांनी पाच वर्षात घेतलेले निर्णय पाहिले तरी हे लक्षात येते.

समाजाच्या अगदी तळाच्या लोकांनाही आपलेसे करता येतील असे अनेक निर्णय मोदींनी घेतले आहेत. त्यामुळे भाजपाला एरवी अपेक्षित नसलेल्या वर्गातून जोरदार पाठींबा मिळत आहे. घरोघर गॅस नेऊन पोचवणारी मोदी सरकारची उज्वला योजना किती परिणामकारक आहे याचा अंदाज वातानुकूलित बसून गणिते मांडणार्‍या मोदीद्वेष्ट्यांना येणार नाही. पण ग्रामीण भागातल्या महिलांचा पाण्याइतकाच कटकटीचा विषय त्यातून हाताळला गेला आहे आणि त्यांच्या जगण्याला दिलासा मिळाला आहे. सरपणासाठी पायपीट करणार्‍या महिलेला घरी आलेल्या गॅसमुळे मिळणारा आनंद हा इतर सर्व मुद्दयांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाच प्रकारे शेतकर्‍यांबाबतही मोदी सरकारने काहीच केले नाही असा प्रपोगोंडा विरोधकांनी राबवला होता. पण पंतप्रधान कृषीसन्मान योजना, पीकविमा यांसारख्या योजनांमुळे अनेक शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात काही हजार रुपये जमा झाले.

कॉंग्रेसच्या किंवा गेल्या ६०-७० वर्षांच्या काळात अशा प्रकारची रक्कम एका सरकारच्या काळात विनासायास कधीच जमा झाली नाही, असे सांगणारे असंख्य शेतकरी आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी सन्मान योजनेअंतर्गत ५० हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे १००० कोटी रुपये जमा झाले.

असे अनेक योजनांचे दाखले देता येतील पण दोन गोष्टी सांगण्याची गरज आहे. पहिली म्हणजे मुस्लिम समुदायाचा विश्वास. गेल्या साठ-सत्तर वर्षांतून भारताच्या राजकारणात शिरलेली एक प्रवृत्ती मोदींनी कमी केली आहे. ती म्हणजे मुस्लिम अनुनयाची. मोदींनी मुस्लिमांचा अनुनय केलेला नाही पण मुस्लिमांचा दुस्वासही केलेला नाही. आपण देशातल्या जनतेसाठी काम करीत आहोत त्याचे लाभ सर्वांना होत आहेत तसेच ते मुस्लिमांनाही होत आहेत. त्याचा वेगळा उल्लेख करण्याची काही गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे आणि तसे दिसतही आहे. मोदी म्हणजे मुस्लिमांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा कायम निर्माण केली गेली; पण याच मोदींनी मुस्लिमांसाठीच्या अनेक योजनांची आर्थिक मदत दुपटीने वाढवली आहे. पदवीधर मुस्लिम तरुणीला विवाहात ५१ हजार रुपये मदत करणारी शादी शगुन योजना तर सारे भ्रम दूर करणारी आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यावर मुस्लिमांना फार त्रास होईल हा प्रचार खोटा ठरल्याने अनेक ठिकाणी मुस्लिम लोक मोदींच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. मोदींना या देशातल्या मुस्लिमांचा पाठींबा कधीच मिळणार नाही याची खात्री बाळगून गणिते मांडणार्‍या विद्वानांना ही गोष्ट अस्वस्थ करीत आहे. पण तेच मोदींचे बळ ठरत आहे.

दलित समाजाचीही स्थिती अशीच आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर आरक्षण रद्द होईल आणि ते घटना बदलतील अशी आवई उठवण्यात आली होती, पण याही दोन आवया खोट्या ठरल्या आहेत. त्यामुळे दलित तरुणांच्या मनातही आता असा विचार येत आहे की, आपण मोदींना विरोध करण्याचे कारणच काय? याही समाजात मोदींना चांगले समर्थन मिळत आहे. मोदींच्या विरोधकांनी मोदींबाबत केलेले अंदाज आणि त्यांनी केलेले मोदींच्या व्यक्तीमत्त्वाचे आकलन यांना छेद देणार्‍या अनेक गोष्टी गेल्या पाच वर्षात झाल्या आहेत. मोदी जे काही करीत आहेत ते मोठे नियोजनपूर्वक करीत आहेत. त्यांच्या नियोजनापुढे त्यांचे कोणतेच विरोधक टिकत नाहीत. समाजाच्या सगळ्या वर्गांचा पाठींबा मिळवण्यात त्यांना यश आले आहे.

गेल्या काही वर्षार्ंत भारतीय जनता पार्टीला एक पक्ष म्हणून मिळणारे समर्थन वाढत आहे. पक्षाच्या कमिटेड मतदानात वाढ होत आहे. महाराष्ट्रात अनेक गावातून याची प्रचिती आली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ज्या गावांत भाजपाचे नावही कोणी घेत नव्हते त्या गावातले युवक अहमहमिकेने भाजपाचे समर्थन करीत आहेत. भाजपा सत्तेवर आल्यास देशाची प्रगती वेगाने होते असा त्यांचा अनुभव आहे. भाजपाचे नेते वेगाने निर्णय घेतात.

विकासाच्या कामांना चालना देतात, हे या मतदारांना दिसायला लागले आहे. हे बांधील मतदान असेच वाढत गेले तर भाजपाचा प्रभाव कमी करणे कोणालाच शक्य होणार नाही याची त्यांच्या विरोधकांना जाणीव होत आहे आणि मोदी नावाचा हा झंझावात कसा रोखावा या प्रश्नाने ते त्रस्त झाले आहेत. पण त्यांच्या विरोधकांत त्यांची बरोबरी करू शकेल असा एकही नेता आजतरी दिसत नाही.

– अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार,- राजकीय विश्‍लेषक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!