३८ गावांच्या सुरक्षेसाठी फक्त ३८ पोलीस

0

प्रशांत चौधरी :  धानोरा | ता.चोपडा :   येथून जवळच असलेल्या अडावद पोलिस स्टेशनला परिसरातील ३८ खेड्यांची सुरक्षा राखण्यासाठी केवळ ३२ कर्मचारी देण्यात आल्यामुळे दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगार्‍या चोरीच्या घटना, हप्तेखोरीत वाढ, त्यामुळे गुन्हेगारांना व गुन्हे करण्यासाठी रान मोकळे, व खुले मैदानच मिळाले असल्याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ३८ कर्मचारी सुरक्षेची मदार सांभाळीत आहेत. एकूण ३८ खेडे गावांमध्ये वडती, विष्णापूर, बोरखेडा, खरद-नारद, माचला, शेकमाळ, देवझिरी, खेडी भोकरी, देवगड, देव्हारी, बोरमळी, उनपदेव, खर्डी, बिडगाव, मोहरद, लोणी, पंचक, धानोरा, मितावली, वरगव्हाण, मन्यावस्ती, चांदसणी, कमळगाव, पिंप्री, वर्डी, गोरगावले खुर्द, मंगरुळ, पांढरी, देवगाव, पारगाव, बडाई, अडावद, रुखणखेडा, वडगावसिम, वडगाव आदी गावे आहेत.

या गावांमध्ये ५ गावे अतिसंवेदनशील असून १६ गावे संवेदनशिल आहेत. अतिसंवेदनशिल गावामध्ये अडावद, मोहरद, वर्डी, धानोरा, बिडगाव यांचा समावेश आहे. त्यातील बिडगाव गावाला दुर्गा विर्सजन मिरवणुकीत जातीय दंगल झाली त्यानंतर गावात एकोपा नांदत असून गावाला आदर्श तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे.

अडावद पो.स्टे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच स्मार्ट पोलीस स्टेशन करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यात अडावद पो.स्टे.ला स्मार्ट पोलिस स्टेशन करण्यासाठी पोनि जयपाल हिरेे समोर मोठे तगडे आव्हान ठरणार आहे. सन २०१५ मध्ये या पोलिस स्टेशनला एकुण ४४ कर्मचारी होते.

मात्र गेल्या दोन वर्षात १२ कर्मचारी कमी झाले असून जिल्हावरुन नविन कर्मचारी येण्यास इच्छुक नाही म्हणून कर्मचारी मिळत नाहीत.

अतिसंवेदनशील गावात दररोज काही काही ना घडत असते. महामार्गावरील गावांमध्ये दररोजच्या चोरीच्या घटना घडत आहेत. अनेक पोलिस अधिकारी अडावदला पोनि होण्यासाठी मोठी फिल्डींग लावतात. त्यामुळे हे पोलिस स्टेशन मिळविण्यासाठी अनेकांची धडपड असते. अडावद पोलिस स्टेशनच्या हद्दीत अतिसंवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल.

तसेच मोठया गावांमध्ये पोलिस चौकी उभारल्यास घडणार्‍या चोर्‍या, आक्रमक आंदोलनाच्या घटनांवर पोलिसांना नियंत्रण ठेवता येईल. अवघ्या १ वर्षात धानोरा गावात लहान मोठ्या १२ घटना घडल्या आहेत. हद्दीतील काही गावे हे सातपुडा पर्वताजवळील आहेत. त्यात या ठिकाणी अतिक्रमण करुन राहत आहेत. मध्य प्रदेशातील विविध जातीच्या लोकांची चौकशी होणेसुध्दा महत्वाचे आहे.

या पोलीस स्टेशनला शांतता प्रस्थापित करणे कठीण असते. मात्र पोनि योगेश देशमुख यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीवर वचक बसला होता मात्र त्यांच्यावर ऍन्टीकरप्शनच्या कारवाईने अडावद पो.स्टे.ची अब्रू वेशीला टांगली होती.त्यांनतर नियुक्त झालेले जयपाल हिरे यांनी पदभार घेतल्यावर दोन महिने गुन्हेगारीवर वचक राहीला खरा मात्र आता पुन्हा गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे.

विघ्नसंतोषी लोकांनी कोणाचेही नुकसान होणार नाही अशी काळजी घेतल्यास सहजासहजी कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल होणार नाही. व सर्व भांडण तंटे आपसात समजुतीने मिटतील. या पोलिस स्टेशनला उर्वरीत पोलिस कर्मचारी दिल्यास रात्रीच्या वेळी गस्त घालतांना मदत होणार आहे.

तर दिवसा धानोरा चौफुलीवर बेशिस्त वाहतुकीला आळा बसेल. त्यामुळे अडावद पो.स्टे.ला वाढीव पोलिस कर्मचार्‍यांची तुकडी पुरविण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहेत. नविन कर्मचारी वाढविण्यासाठी वरिष्ठांकडे तसा अहवाल दिला असून यातील अतिसंवेदनशिल गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले.

वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा दल नविन स्थापन करुन पोलिसांच्या सहाय्याने समाजातील विघ्नसंतोषी, समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावातील पोलिस पाटलांना गावात नविन व्यक्ती, भिकारी, लहान मुले यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुन्हेगारी रोखण्यात यश मिळणार – पोनि जयपाल हिरे

अडावद पो.स्टे.उर्वरीत कमी संख्या असलेल्या पोलिस कर्मचारी मिळाल्यास गुन्हेगारी रोखता येणार आहे. गुन्हेगार कोणत्याही स्वरुपाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. नविन कर्मचारी येण्यास इच्छुक नसल्याने वरिष्ठांना केलेल्या मागणी वर समजते.

LEAVE A REPLY

*