आरोग्यधिकारी डॉ.पाटील यांच्या कार्यमुक्तीचा ठराव मंजूर

0
जळगाव । दि.9 । प्रतिनिधी – शहरात दैनंदिन साफसफाईच्या कामात अकार्यक्षम असल्याने व जंतूनाशक खरेदीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी महापालिकेचे आरोग्यअधिकारी डॉ. विकास पाटील यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव आज विशेष महासभेत करण्यात आला. मनपाला मिळालेल्या 25 कोटीच्यानिधीतील कामांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
महापालिकेची विशेष महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अंदाजपत्रकाला मंजूरी दिल्यानतंर दुसर्‍या विशेष महासेभला सुरुवात झाली.

सुरुवातीलाच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी टीडिआर घोटाळ्याप्रकरणी चुकीचे मत देणारे अ‍ॅड. केतन ढाके यांच्यावर काय कारवाई झाली कसा सवाल आयुक्तांपुढे मांडला.

यावर प्रभारी आयुक्तांनी शासनाने या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे चौकशी समीती नेमण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

तसेच संबंधित पदाधिकार्‍यांना ही आपले मत मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी सांगीतले.

साहित्यांसाठी तीन कोटी 22 लाखांचा प्रस्ताव
महापालिकेतील आरोग्य विभागासाठी 14 व्या वित्त आयोगातून 3 कोटी 22 लाख 87 हजार 490 रुपयांचे साहित्य घेण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला.

यामध्ये 4 वाटर टँकर, व्हॅक्युम 1 नग, रॉडींग मशिन 1 नग, साफ सफाईचे साहीत्य, 1 ते 37 वार्डातील 150 नग कचरा कंटेनर, 2 नग फिरते शौचालय व 6 टॅक्टर ट्रॉलीसह, 1 रोबोटीक जेसीबी मशिन असे खरेदी केले जाणार आहे.

25 कोटीच्या निधीवरुन शाब्दीक चकमक
विकासकामसांसाठी मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून करण्याचा हट्ट विरोधी पक्षाकडून केला जात होता.

यावर या प्रकार अयोग्य असल्याचे महापौरांनी सांगीतले. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे सुपरव्हीजन शुल्क अनावश्यक द्यावे लागणार आहे.

मनपाला मिळालेला निधी ना. महाजन यांच्यामुळे मिळाल्याचे कैलास सोनवणे यांनी सांगीतले. यावरुन सत्ताधारी व भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद होवून खडाजंगी झाली.

दरम्यान या निधीची कामे मनपाकडून करण्याचा ठराव करण्यात आला. तर आमदार खासदार निधीच्या कामांना मंजूरी नाही अश्या प्रकारे बांधकाम विभागाकडे काम दिल्यास यापुढे आमदार व खासदार निधीतील कामे महापालिका मंजूर करणार नाही असा इशारा रमेश जैन यांनी दिला.

आरोग्यधिकार्‍यांची कानउघणी
महासभेत नितिन बरडे, वर्षा खडके यांनी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्या जंतुनाशक खरेदीच्या घोटाळ्यावरुन संताप व्यक्त केला. जंतुनाशके व दुर्गंधीनाशकांची कींमत 90 रुपये लिटर असून त्याची खरेदी ही 1 हजार 320 रूपये लिटर प्रमाणे केल्याचा अरोप देखील यावेळी करण्यात आला. तसेच डॉ. विकास पाटील यांच्या कार्यक्षमतेबद्दल सर्व लोकप्रतिनीधी नाराज असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतलले. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी डॉ. पाटील यांच्याविरुध्द भावना व्यक्त करुन त्यांचा पदभार उदय पाटील यांच्याकडे सोपविण्याच्या ठराव यावेळी मांडण्यात आला.

विरोध असतांनाही तलावाला डांबरीकरण का?
मेहरुण तलावाच्या आजूबाजूच्या रस्त्याची जागा मनपाची नाही. तसेच याठिकाणी डांबरीकरण करण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. परंतू याठिकाणी डांबरीकरण करण्यासाठी सत्ताधारी ऐवढा हट्ट का करीत आहे.

त्याऐवजी शहरातील इतर ठिकाणाच्या गटारी व रस्ते करण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी मांडला. यावर महापौरांनी सांगीतले की, शहरातील रस्ते व गटारींची कामे ही अमृत योजनेच्या प्रलंबीत असलेल्या कामांमुळे करता येणार नाही.

तसेच हा निधी परत जावू नये याकरीता हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

सत्ता आणि पैशांसमोर चांगले विचार टिकत नाही-रवींद्र पाटील

मनपाची भोईटे शाळेची इमारत अनुभूती स्कूलला देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. यावर सत्ताधार्‍यांना उद्देशून सत्ता आणि पैसा यापुढे सर्वसामान्यांचे काहीही चालत नसल्याचा चिमटा सत्ताधार्‍यांना काढला. तसेच या वाक्याची नोंद इतिवृत्तात करण्याची सुचना देखील रविंद्र पाटील यांनी सभागृहाला केली.

मनपाची आर्थिक परिस्थीती बिकट असल्याचे सांगून विकासकामे केली जात नसून ही कामे लोकसहभागातून केली जातात.

मनपा कार्यक्षम नसून महापालिका देखील एखाद्य संस्थेस चाविण्यासाठी द्यावी असा ठराव देखील मंजूर करण्यात यावा असे रविंद्र पाटील यांनी सांगीतले. तसेच महापौर उत्तर देण्यात पटाईत असल्याचा चिमटा देखील त्यांनी महासभेत महापौरांना काढला.

 

 

LEAVE A REPLY

*