Type to search

जळगाव

निवडणूक आयोगाने कारवाईसोबत कर्मचार्‍यांची परिपूर्ण जबाबदारी घ्यावी

Share

न्हावी, ता. यावल। वार्ताहर  :  विविध निवडणुका पार पाडणारा कर्मचारी हा निवडणूक प्रक्रियेचा प्रमुख कणा असतो. पण हे पवित्र कार्य करणार्‍या या कण्याला कुठलाही विचार न करता त्याला या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या कारवाईच्या धाकाने राबवून घेतले जाते असेच म्हणायला हरकत नाही. म्हणून निवडणूक आयोगाला बद्दल या मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनामध्ये तिटकारा निर्माण झाला आहे.

रावेर लोकसभा क्षेत्रासाठी 23 एप्रिलला तिसर्‍या टप्प्याचे मतदान आटोपले. मुळात मागील तीन निवडणुकांपासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एका विधानसभा मतदारसंघातील कर्मचार्र्‍यांना अंदाजे 70 ते 120 किलोमीटर दूर दुसर्‍या विधानसभा मतदारसंघात अदलाबदल केले जात आहे. यातच या कर्मचार्‍यांची ससेहोलपटीला सुरुवात होते. नियुक्तीनंतर पहिले प्रशिक्षण वर्ग ज्या ठिकाणी नोकरी आहे त्या ठिकाणच्या विधानसभा क्षेत्रात घेतले जाते. दुसर्‍या प्रशिक्षणासाठी या कर्मचार्‍यांचे मतदान कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून जिथे नियुक्ती केली आहे त्या विधानसभा मतदारसंघात पाठविले जाते. म्हणजेच विधानसभा मतदारसंघ बदलविला जातो.

उदाहरणच द्यायचे झाले तर भुसावळ येथील कर्मचारी मुक्ताईनगर, जामनेर, रावेर ,चोपडा अशा ठिकाणी पाठविले जातात आणि तेथील कर्मचारी या भागात पाठविले जातात. नेमके हे कशासाठी केले जाते हे कोडे आजपर्यंत न उलगडणारे आहे. सर्व विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणारे शासनाचे त्याच दर्जाचे अधिकारी असतात. प्रशिक्षणाचा विषय तोच असतो. दुसर्‍या मतदारसंघात प्रशिक्षणाला जाण्यासाठी शासनातर्फे कोणतीच व्यवस्था केली जात नाही. मग हे कर्मचारी मिळेल त्या वाहनाने हाल-अपेष्टा सहन करत संबंधित ठिकाणी प्रशिक्षणासाठी जात असतात.

यामध्ये अनेकांना छोटे मोठे अपघात झाले, परंतु त्याची नोंद कुठेही नाही. एवढेच नाही तर न्हावी तालुका यावल येथील जे. टी. महाजन तंत्रनिकेतन मधील पंकज गोपाळ चोपडे याचा निवडणुकीच्या आदल्या दिवशी रांगेमध्ये निवडणुकीचे सामान घेत असताना खाली पडला. त्याला दवाखान्यात नेले आणि 23 एप्रिलला म्हणजेच मतदानाच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. याची जबाबदारी निवडणूक आयोग येईल काय ? त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? हा मोठा प्रश्न पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने समोर येत आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत आपल्या निवासस्थानापासून तर संबंधित ठिकाणी जाण्यासाठी किमान 70 ते 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुख्यालयात हजर व्हावे लागते. त्याठिकाणी नवीन आदेश घेऊन अनोळखी गावात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान साहित्य घेऊन चमूला सरकारी वाहनाद्वारे पाठविले जाते.

त्या अनोळखी गावात कर्मचार्यांना साधं दोन वेळचं जेवण सुद्धा मिळेल याची शाश्वती नसते. तिथे विना पंख्याने प्रचंड दडपणाखाली आयोगाच्या कारवाईच्या भीतीने आहे त्या स्थितीत राहून मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे लागते. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रांमध्ये बोदवड या ठिकाणची परिस्थिती अतिशय भयानक, घाणेरडी, आणि अस्वच्छ होती . मतदान कक्षामध्ये अक्षरशः मूत्राचा वास येत होता. एवढेच नाही तर त्याठिकाणी शौचालयाची सुद्धा सोय नव्हती. त्यामुळे भिंतीच्या आडोशाला उघड्यावरच प्रात:विधी करावे लागले. संबंधित तलाठी साहेबांना आम्ही पाण्याची व्यवस्था करायला सांगितले तर ते म्हणाले ,पिण्यासाठी पाणी मिळेल मात्र आंघोळीसाठी पाणी मिळणार नाही .

त्यासाठी त्यांनी पिण्याच्या पाण्याचे जार पुरविले मात्र आंघोळीसाठी जास्त आग्रह केला असता त्यांनी रात्री एक टँकर उभे करून दिले. सकाळी आमच्यापैकी काही कर्मचार्‍यांनी उघड्यावरच आंघोळ केली. मतदान कक्षामध्ये कोणत्याही प्रकारची पंख्यांची सुविधा नव्हती. शेवटी रात्री केव्हातरी पंखे पुरविण्यात आले. काही लोकांनी खाजगी पंखे ,कुलर सांगितले आणि त्याचे पैसे स्वतः दिले. मतदान अधिकारी काम करीत असताना त्याला जेवणाची फुरसत नसते. मात्र बोदवड या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जेवणाची व्यवस्था केलेली नव्हती. तेव्हा आमच्यापैकी एखाद्या कर्मचार्‍याने बाहेर जाऊन सकाळी नाश्ता आणला व दुपारी जेवण सुद्धा आणले.

परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे दोन-दोन लोकांनी कसे तरी जेवण उरकले . आम्हाला कोणीही जेवणा बद्दल काहीही विचारलं नाही ही निवडणूक कर्मचार्‍यांची शोकांतिका आहे. निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असताना निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी नवीन नवीन सूचना देण्यात येऊन फार्म नंबर 13-उ वेळेवर भरून द्या , व्ही व्ही पॅटची बॅटरी काढून तिला मोकळी द्या. हा फार्म एक शील करून द्या आणि एक हातात मोकळा ठेवा. हा फॉर्म भरून द्या ,तो फार्म भरून द्या असे अनेक प्रकारचे नियम वेळोवेळी बदलून सांगितले जातात .

यावेळेला बोदवडला सामान जमा करताना अतिशय चुकीची व किचकट व्यवस्था होती. यामध्ये रात्री आठ वाजता रांगेत समान जमा करण्यासाठी उभे राहिलेले व्यक्तीच रात्री सव्वाअकरा वाजता सर्व साहित्य जमा झालं . साहित्य जमा करणार्‍या अधिकार्‍यांना काय जमा करायचं, कसं जमा करायचं -याचं प्रशिक्षण दिलेले आहे असं वाटलंच नाही. त्यामुळे मागून येणार्‍याचे साहित्य अगोदर जमा केले जात होते. तेवढा तरी बरं की एका ठिकाणी फक्त वीस बूथ चे साहित्य जमा केले जात होते आणि जे प्रथम रांगेमध्ये उभे होते हे त्यांचं साहित्य जमा होत नव्हतं. प्रथम रांगेमध्ये उभे होते ते सांगून सांगून थकले, की साहेब साहित्य जमा करा .परंतु साहेबांना त्याचा काहीच सोयरसुतक नव्हतं. मात्र दुसरीकडे अतिशय व्यवस्थित आणि पटापट साहित्य जमा केले जात होतें.

रिकाम्या झालेल्या पदाधिकार्‍यांना मदतीसाठी इकडे बोलवा असं संबंधितांनी सांगितले मात्र त्याकडे जमा करणार्‍या अधिकार्‍यांनी साफ दुर्लक्ष केले .शेवटी एकदाचा साहित्य जमा झाल्यानंतर क्षेत्रीय अधिकार्‍यांना रिपोर्ट करायचा होता. तत्पूर्वी साहित्य जमा केल्यानंतर पुरी आणि बटाट्याची भाजी सोबत खिचडीचे जेवण होते. क्षेत्रीय अधिकार्‍यांना रिपोर्ट केल्यानंतर त्यांच्याकडून रिलिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचे होते. हे मात्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून माइक वरती संबंधित टीमचा पुकारा झाल्याशिवाय घरी जायचं नाही अशी अट होती . रात्री बारा साडेबारापर्यंत रीलींव्हिंग सर्टिफिकेट मिळाले.आणि मग रात्री मिळेल त्या वाहनाने किंवा आपण आणलेल्या वाहनाने पुन्हा आपला घरचा प्रवास सुरू होतो .

पण पुन्हा 70 ते 120 किलोमीटर अंतर सुरक्षित जाऊन आपल्या कुटुंबात पोहोचू याची खात्री कुणालाच नसते. या निवडणुकीसाठी दोनदा प्रशिक्षण व मतदानासाठी दुसर्‍या मतदारसंघात जाणे -येण्यासाठी, जेवणासाठी प्रत्येक कर्मचार्‍याचे किमान हजार ते बाराशे रुपये खर्च झाले असावेत. निवडणूक आयोगाकडून या वेळी फक्त सतराशे, तेराशे ,आणि 600 रुपये एवढे मानधन मिळाले.या मतदान प्रक्रियेतील कर्मचारी कुठलाही विचार न करता मतदान प्रक्रिया ही पवित्र प्रक्रिया आहे आहे हे समजून काम करत असतो. या प्रक्रियेचा कर्मचारी हा एक महत्त्वाचा कणा आहे . एक कर्तव्य म्हणून प्रत्येक कर्मचारी आपल कर्तव्य चोख बजावतो. पण त्याच्या दुसर्‍या बाजूला सुद्धा प्रशासन व निवडणूक आयोगाने कुठेतरी विचार करावा अशी माफक अपेक्षा प्रत्येक मतदान कर्मचारी व अधिकारी करत आहे. यावेळेला मतदान कर्मचारी तीन नंबर म्हणून काही ठिकाणी महिलांची नियुक्ती केलेली होती .

मात्र संध्याकाळी मतदान संपल्यानंतर काही मतदान केंद्राध्यक्ष यांनी महिलांना मतदान साहित्य जमा करण्यासाठी आमच्यासोबत संबंधित ठिकाणी यावे असा आग्रह धरला होता. मात्र काही ठिकाणी महिलांनी याला विरोध दर्शविला आणि त्या मतदान साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी गेल्या नाही.

याबाबत निवडणूक आयोगाचे कोणतेही स्पष्ट आदेश नव्हते.जर तुम्ही मतदान साहित्य जमा करायला आले नाही तर तुम्हाला तुमचे मानधन मिळणार नाही अशी भूमिका काही ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष यांनी घेतली होती.मतदान अधिकारी नंबर तीन महिलांचे म्हणणे असे होते की आम्ही त्या ठिकाणी मतदान साहित्य जमा करायला आल्यानंतर रात्री परत कसे यायचे .याबाबतचा खुलासा पुढील वेळी ट्रेनिंग घेताना होणे आवश्यक आहे अशी या सर्व निवडणूक कर्मचार्‍यांची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!