Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव जिल्हा भाजपासोबतच तर धुळे-नंदुरबारमध्ये परिवर्तनाला साथ

Share

हेमंत अलोने
जळगाव।

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने उत्कंठा शिगेला पोहचली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज बांधत आहे. अनेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. देशात पुन्हा नरेंद्र मोदी की कॉंग्रेस आघाडीची सत्ता ही चर्चा रंगली आहे. देशदूतनेही अनेकांशी संवाद साधत निकालाबाबत बोलते केले. सर्वसाधारण मतदार, युवक, युवती, नोकरदार, व्यापार, उद्योग, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार, राजकीय विश्लेषक, माध्यम जगतातील जाणकार अशा अनेकांशी चर्चा करुन देशदूतनेही खान्देशातील निकालाची चाचपणी केली. यात खान्देशात भाजपा आणि कॉंग्रेसला 50-50 टक्के विजयाची संधी असल्याचे समोर आले. जळगाव जिल्हा पुन्हा एकदा भाजपासोबतच राहिल तर धुळे-नंदुरबार जिल्ह्यात कॉंग्रेसला अच्छे दिन येण्याचा अंदाज समोर आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खान्देशमधील जळगाव, रावेर, धुळे हे तीन मतदारसंघ सातत्याने भाजपासोबतच राहिले आहेत. कॉंग्रेसचा पारंपरिक गड नंदुरबार गेल्या निवडणुकीत भाजपाने काबीज केला होता. यावेळी जळगाव आणि रावेर मध्ये पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा अंदाज आहे तर धुळ्यात अनपेक्षितपणे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना मात देत आ.कुणाल पाटील विजय संपादन करतील तर नंदुरबारात विद्यमान खासदार डॉ.हिना गावित यांनाही पराभवाचा ङ्गटका बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

रावेर मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे विरुध्द कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यात सामना झाला. कॉंग्रेस आघाडीने अनेक दिवस घोळ घातल्यानंतर कॉंग्रेसला जागा दिली. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनीही अत्यंत कमी दिवसात कडवी झुंज दिली. कॉंग्रेसने डॉ.पाटील यांची उमेदवारी किमान 15 दिवस आधी ठरवली असती तर या मतदारसंघातील लढत अत्यंत उत्कंठावर्धक झाली असती. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचाराचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले. त्यांना ङ्गारशा सभा घेणे जमले नसले तरी मोबाईलवरुन ते सतत संपर्कात होते. खा.रक्षा खडसे यांना जनसंपर्कही कामी आला. त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. खडसेंच्या विजयाबद्दल अनेकांना अप्रुप नसले तरी डॉ.उल्हास पाटील यांनी दिलेल्या लढतीचे अनेकांनी कौतुक केले. खा.रक्षा खडसेंच्या मताधिक्याबाबतही वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात आले.

जळगाव मतदारसंघात सोपी असलेली लढत भाजपानेच अटीतटीवर नेऊन ठेवली. विद्यमान खासदारांचे तिकीट कापणे, ऐनवेळी जाहीर झालेला व उमेदवारी अर्ज दाखल झालेला उमेदवार बदलणे, मंत्र्यांसमोर हाणामारी यामुळे हा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला होता. या मतदारसंघात भाजपाचे आ.उन्मेष पाटील व राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात सामना झाला. देवकरांनी सर्वार्थाने सुसज्ज भाजपाच्या नाकी नऊ आणले. प्रचारात ते अखेर पर्यंत पुढेच राहिले. मात्र उमेदवारापेक्षा मोदी ङ्गॅक्टर प्रभावी ठरल्याने येथे अत्यंत अटीतटीच्या लढतीत अत्यल्प मतांनी आ.उन्मेष पाटील बाजी मारतील असा अंदाज वर्तविला जात आहे. जळगाव शहरात मतधिक्य मिळवणार्‍यालाच दिल्लीचे तिकीट मिळेल असा अंदाज आहे. शिवाय वंचित आघाडी व मुस्लीम मते कुठे झुकतात यावरही विजयाचा काटा इकडे तिकडे होऊ शकतो इतकी कडवी झुंज येथे झाली आहे. जळगावात भाजपाचा विजय झालाच तर त्याचे श्रेय भाजपापेक्षाही अधिक शिवसेनेलाच द्यावे लागेल, निकाल उलट लागला तरी हाच घटक कारणीभूत ठरेल, असा अंदाज आहे. जळगावच्या निकालाबाबत अनेकांशी चर्चा केली असता विजय, पराभवामध्येही एखाद्या टक्क्याचाच ङ्गरक होता, हे विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे.

धुळ्यातून विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे विरुध्द आ. कुणाल पाटील यांच्यातील लढत अत्यंत निसटती आहे. अंदाज वर्तविण्यासही ङ्गारसे कोणी पुढे येत नाही, असे चित्र आहे. अशातही जे थोडके बोलले त्याच्यानुसार धुळ्यात यावेळी आ.कुणाल पाटील बाजी मारतील याची शक्यता अधिक आहे. धुळे ग्रामीण हा आ.कुणाल पाटलांचा मतदारसंघ आहे, शिंदखेड्यातील काही गावे रोहिदासदाजी पाटील यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केलेल्या कुसुंबा मतदारसंघात होती. धुळे शहरात जवाहर गटाच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शिवाय अनिल गोटे जी मते घेतील त्याचा धोका डॉ.भामरेंनाच जास्त दिसतो आहे. मालेगावातील एकगठ्ठा मते यासर्व बाबींमुळे जाणकार धुळ्यातून आ.कुणाल पाटील यांच्या विजयाचा अंदाज बांधत आहेत. धुळ्यात पहिल्यांदाच पाडापाडीचे राजकारण सोडून दिलजमाईचे राजकारण कॉंग्रेसमध्ये दिसले त्याची ङ्गळे चाखण्याची संधी कॉंग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे.

नंदुरबार हा कॉंग्रेसचा परंपरागत गड गेल्यावेळी मोदी लाटेत नेस्तनाबुत झाला होता. यावेळी भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित विरुध्द कॉंग्रेसचे आ.ऍड.के.सी. पाडवी यांच्यात सामना रंगला. सुहास नटावदकरांची बंडखोरी, मराठा आंदोलनकर्त्यांबाबत घेतलेली भूमिका, धनगर आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका खा.डॉ.हिना गावित यांना भोवणार असल्याचा अंदाज अनेक जण वर्तवित आहेत. गेल्यावेळी डॉ.हिना गावित यांना शिरपूर मधून मताधिक्य होते मात्र त्यावेळी आ. अमरिशभाई पटेल स्वतः उमेदवार असल्याने त्यांची सर्व ङ्गौज धुळ्यात कार्यरत होती. यावेळी तशी स्थिती नव्हती. मात्र रंधे परिवाराने घेतलेल्या मेहनतीमुळे शिरपूरमधून एकतर्ङ्गी स्थिती कॉंग्रेससाठी नसेल असेही अनेकांनी ठामपणे सांगितले.

सर्वच उमेदवारांना ‘देशदूत’च्या शुभेच्छा
समाजातील अनेक घटकांशी चर्चेअंती हा अंदाज मांडला आहे. एकूण मतदार आणि आम्ही अजमावलेली मते याचे प्रमाण व्यस्त आहे, याची आम्हास जाणीव आहे. दि. 23 रोजी चित्र स्पष्ट होईल.तो पर्यंत सर्वच उमेदवारांना विजयासाठी ‘देशदूत’च्या शुभेच्छा आहेतच!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!