Type to search

जळगाव

चाळीसगावच्या लाचखोर वनपाल, वनरक्षकाला चार वर्षाची सक्तमजुरी

Share

जळगाव । प्रतिनिधी :  तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने वनपाल रघुनाथ देवरे व वनरक्षक विठ्ठल भास्कर पाटील रा. दोघे बहाळ ता.चाळीसगाव यांना दोषी ठरवून 4 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावी तक्रारदार योगेश वाल्मिक सुतार यांचे ओम साई फर्निचर अ‍ॅन्ड वेल्डिंग वर्कशॉप नावाने फर्निचर तयार करण्याचे दुकान असून दि.21 जुलै 2015 रोजी तक्रारदार यांच्या दुकानात सागवान लाकूड आढळून आले होते. त्यानुसार जुवार्डी वनबीटचे हवालदार रघुनाथ रामदास देवरे यांनी तक्रारदार योगेश याच्याकडे लाकूड खरेदीच्या पावत्या मागितल्या होत्या. परंतू तक्रारदार याच्याकडे जास्तीचे सागवान लाकूड मिळून आले वनबीट हवालदार यांनी गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगून तक्रारदार योगेश सुतार यांच्याकडे 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार तक्रारदार योगेश याने दि.23 जुलै रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचल्यानंतर तक्रारदार योगेश याने वनपाल रघुनाथ देवरे यांच्याकडे लाचेचे 5 हजार रुपये दिले असता, त्याने वनरक्षक विठ्ठल पाटील यांच्याकडे 5 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर वनरक्षक विठ्ठल पाटील यांनी 5 हजार रुपये तक्रारदार याच्याकडून स्विकारून बॅगेत ठेवले.

याचवेळी दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात तक्रारदार याच्या फिर्यादीवरून वनपाल रघुनाथ देवरे व वनरक्षक विठ्ठल पाटील या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या कलमाखाली सुनावली दोघांना शिक्षा

लाच मागितल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात चालले. या खटल्याप्रकरणी सरकारपक्षातर्फे तक्रारदार योगेश सुतार, शासकीय पंच, सक्षम अधिकारी, मुख्य वनसंरक्षक, तपासधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

त्यानुषंगाने लाचेची मागणी व लाच स्विकारल्याप्रकरणी कलम 7 अन्वये दोघांना तीन वर्षाची सक्तमजुरी शिक्षा 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, तसेच कलम 13(1),(ड) या कलमाखाली चार वर्षाची सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनिल शिरसाठ, पैरवी अधिकारी अनिल सपकाळे व देविदास कोळी यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!