भावनांचे अर्थकारण

0
अलीकडील काळात समाजामध्ये कुमारी मातांचे प्रमाण वाढत चाललेले असतानाच दुसर्‍या बाजूला वंधत्वाने ग्रस्त असणार्‍या दाम्पत्यांची संख्याही वाढत चालली आहे. कुमारी मातांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची प्रसूती करणे आणि या नवजात अर्भकांची लाखो रुपयांना विक्री करणे यातून आपला गल्ला भरणार्‍यांना व या प्रक्रियेमध्ये सहभागी असणार्‍या दलालांना कठोर शिक्षा व्हायला हवी. तरच अडचणीत सापडलेल्यांच्या भावनांचे अर्थकारण करणार्‍यांना चाप लागेल.

महाराष्ट्रात मागील काळात स्रीभ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. त्यावेळी बीडमधील डॉ. मुंडे दाम्पत्याकडून बेकायदेशीरपणे होणारे गर्भपात आणि त्या अर्भकांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंडे दाम्पत्याने केलेली व्यवस्था यासंदर्भातील कहाण्या वाचून जनमन हेलावून गेले होते. स्रीभ्रूणांची हत्या करण्यामागे असते ती पुरुषप्रधान मानसिकता. या मानसिकतेला वैद्यकीय क्षेत्रातील काही अपप्रवृत्तींची साथ मिळाल्यामुळे असंख्य कोवळ्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या गेल्या. यासंदर्भातील कायदा अस्तित्वात आल्यानंतरही हे प्रमाण कमी झालेले नाही. एका बाजूला स्रीभ्रूण हत्या रोखण्याचे आव्हान असतानाच दुसर्‍या बाजूला जन्मजात अर्भकांची विक्री केली जात असल्याच्या घटनाही समाजात घडत आहेत. मूल नको असणार्‍या आणि गर्भपातासाठी आलेल्या दाम्पत्यांकडून त्यांचे अपत्य विकत घेऊन दत्तक घेण्यास इच्छुक असणार्‍या दाम्पत्याला विकण्याचा व्यवसायच काहींनी थाटला असल्याचे उघड होत आहे.

2014 मध्ये जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या धारावीमध्ये अशा प्रकारचे एक प्रकरण उघडकीस आले होते. तेथे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी-विक्रीसाठीच्या या कथित ‘प्रॉडक्ट’ची जाहिरात केली जात असे. संबंधित प्रॉडक्ट खरेदीदाराला पसंत पडल्यास भेटीची वेळ ठरवून प्रचंड मोठ्या किमतीवर त्याची खरेदी केली जात असे. एवढेच नव्हे तर या बाळांचे बनावट जन्मदाखलेही बनवले जात असत. कायदेशीरदृष्ट्या दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने दुकानातून वस्तू विकत आणल्याप्रमाणे पैसे देऊन बाळ विकत आणण्याचा व्यवहार मूल नसलेल्यांना सुलभ वाटत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले होते. सदर प्रकरणामध्ये नवजात बाळ 4 ते 6 लाखांना विकले जात होते आणि यामध्ये मध्यस्थी करणार्‍यांनाही वाटा दिला जात असे. काही आठवड्यांपूर्वी ठाण्यामध्ये एका रुग्णालयातून एका महिलेने नवजात अर्भक पळवून नेले होते, मात्र ठाणे पोलिसांनी शिताफीने त्या महिलेला अटक करून संबंधित मातेला तिचा पोटचा गोळा परत दिला होता. आता केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने इचलकरंजीमधील एका होमियोपॅथिक डॉक्टरवर छापा टाकून तेथे कुमारी मातांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून त्यांच्या अर्भकांची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. सदर डॉक्टर ही अर्भके सात ते आठ लाख रुपयांना विकत असल्याचे उघड झाले आहे. छापा टाकल्यानंतर समोर आलेल्या माहितीतून दोन कुमारी मातांची प्रसूती झाल्याचे आणि त्यांची अर्भके मुंबई व छत्तीसगड येथे विकली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. होमिओपॅथीची पदवी घेतलेल्या डॉ. पाटील यांच्या रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्व गर्भतपासणी यंत्राची (स्कॅनिंग युनिट) सुविधा आहे. या यंत्रावर रेडिओलॉजिस्टची नेमणूक न करता बेकायदा गर्भलिंग तपासणी करण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे गर्भलिंग तपासणीबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी किती कुचकामी आहे, हे यातून स्पष्ट होते. त्यापलीकडे जाऊन कुमारी मातांचे समाजातील वाढते प्रमाण, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अन्य घटकांमुळे वाढत चाललेले वंध्यत्व, दत्तक कायद्यातील किचकट अटी आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती या मुद्यांचाही यानिमित्ताने विचार व्हायला हवा.

अलीकडील काळात समाजात कुमारी मातांचे प्रमाण वाढत चालले आहे. सामाजिक माध्यमांचा परिणाम, सांस्कृतिक, लैंगिक शिक्षणाचा अभाव हे घटक यास कारणीभूत आहेत. मध्यंतरी समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयात महिन्याला अशा किमान सात कुमारी माता येत असून त्यापैकी 50 टक्के मुली या 18 वर्षांच्या आतील असतात. हे प्रमाण शहरी भागातच अधिक आहे असे नाही तर ग्रामीण भागातही ते मोठे आहे. अशाच काही तरुणींना डॉ. अरुण पाटील यांच्यासारखे डॉक्टर पैशांचे आमिष दाखवतात आणि त्यांची प्रसूती करून त्यांचे अर्भक अपत्याची आस असणार्‍या पालकांना विकतात. डॉ. पाटील अल्पवयीन मुलींना आश्रय देऊन त्यांची प्रसूतीपर्यंत रुग्णालयामध्ये राहण्याची व्यवस्था करीत होता. प्रसूतीनंतर चार ते पाच दिवसांचे नवजात अर्भक कुमारी मातेकडून सुमारे दोन लाख रुपयांना विकत घेण्यात येत होते. ते अर्भक अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना चढ्या दराने विकले जात होते. यासंदर्भात एखादे रॅकेट कार्यरत असावे या शक्यतेला वाव आहे. कारण त्याखेरीज मुंबई, नागपूर, छत्तीसगड येथे या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले नसते.

दुसरी गोष्ट म्हणजे आज बदलत्या काळात नवोदित वैवाहितांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत चालली आहे. त्यास विविध कारणे आहेत. वैद्यकीय तंत्रज्ञानाने त्यावर मात करण्यासाठी अनेक उपाय शोधले आहेत, मात्र प्रत्येकालाच ते परवडण्याजोगे नसतात किंवा ते काहीवेळा यशस्वीही होत नाहीत. अशा वेळी सदर दाम्पत्ये डॉ. पाटील यांच्यासारख्यांच्या जाळ्यात अडकतात. कारण मूल दत्तक घेणे ही प्रक्रिया आजही आपल्याकडे पुरेशा प्रमाणात ग्राह्य धरली गेलेली नाही. त्यातच भारतातला दत्तक विधानविषयक कायदा फारच किचकट आहे.

एखाद्याला मूल दत्तक घ्यायचे असेल तर इतक्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात की त्यामुळे दत्तक घेऊ इच्छिणारे दाम्पत्य नियमांच्या जंजाळात अर्धमेले होऊन जाते. आज जगात हजारो दाम्पत्ये अपत्यहीन आहेत. असे लोक भारतात मुले दत्तक घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर देशातल्याही अनेक जोडप्यांना दत्तक मुले हवी असतात. पण प्रत्यक्षात दत्तक विधान करण्याची प्रक्रिया मंद गतीने चालू आहे. ही प्रक्रिया गतिमान केली तर बरीच मुले दत्तक दिली जातील आणि त्यातून बेवारस मुलांचाही प्रश्न सुटेल आणि डॉ. अरुण पाटील यांच्यासारख्यांचे काळे धंदेही बंद होतील.

दत्तक घेणार्‍या पालकांचा ओढा दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेण्याकडे असतो. त्यामुळे जन्मजात अर्भकांना असणारी मागणी मोठी असते. हे वास्तव लक्षात घेऊन या क्षेत्रात दलालही निर्माण झाले आहेत. त्यातूनच अशा रॅकेटस्ची निर्मिती होते. ही रॅकेट तयार होण्यास डॉ. पाटील यांच्यासारखे वैद्यकीय पेशात राहून गैरकृत्ये करणारे काही डॉक्टर हातभार लावत असतात. डॉ. अरुण पाटील याने हॉस्पिटलमध्ये कुमारी मातांची प्रसूती करतो, असे सांगून मी एक चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. मी गरीब मुलींना मोफत औषध देतो. त्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था करतो. प्रसूतीही मोफत करतो. अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना त्यांचे नवजात अर्भक देतो. यावेळी त्या कुमारी मातेच्या आणि दत्तक घेणार्‍या व्यक्तीमध्ये जो परस्पर व्यवहार होतो तो मला माहिती नाही, असे सांगून हात वर केले आहेत. मात्र यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण यातील आर्थिक व्यवहारांची माहिती स्पष्टपणाने पुढे आली आहे. त्यामुळे डॉ. पाटीलवर कायदेशीर कारवाई होणार हे अटळ आहे. मात्र केवळ त्याच्यावर कारवाई करून हे प्रकरण संपवता कामा नये. यासंदर्भातील रॅकेटमध्ये सहभागी असणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी. कदाचित त्या दलालांशी अन्य काही जोडलेले असू शकतात.

एकंदरीतच आज समाजात मानवाच्या भावनिक गरजांचा बाजार मांडणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. आई होण्याची आस असणार्‍या महिला-पुरुष एका बाजूला भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकताना दिसतात. तशाच त्या बेकायदेशीरपणाने नवजात अर्भक विकत घेताना डॉ. पाटील यांच्यासारख्यांच्या रॅकेटच्याही हाती लागतात. दुसरीकडे तरुण वयातील चुकीमुळे अथवा अत्याचारामुळे झालेल्या गर्भधारणेमुळे भयभीत झालेल्या मुली अशा व्यक्तींच्या हाताला लागतात आणि त्यातून हे अर्थवर्तुळ पूर्ण होते. यासंदर्भात केवळ कायदे पुरेसे ठरणार नाहीत, त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. हे प्रबोधन
समाजाबरोबरच वैद्यकीय व्यवसायातही व्हायला हवे. पैशांच्या मोहासाठी चालणार्‍या अशा दुष्कृत्यांमुळे समाजात नवे प्रश्न जन्म घेतात.
– अ‍ॅड. प्रदीप उमाप

LEAVE A REPLY

*