Tuesday, April 23, 2024
Homeजळगावदुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कलंडली,कोल्हे हिल्सजवळ वाघनगरातील तरुण ठार

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कलंडली,कोल्हे हिल्सजवळ वाघनगरातील तरुण ठार

जळगाव –

कोल्हे हिल्सवरुन खाली उतरत असताना समोरुन भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कलंडली. यातील वाघनगरातील जिजाऊनगरामधील भुपेंद्र संतोष पाटील (वय 32) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबतचे तीन मित्र जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्सजवळील वास्तुनगरानजीकच्या रस्त्यावर घडली.

- Advertisement -

वाघनगर भागातील जिजाऊनगरातील भुपेंद्र संतोष पाटील हे आयसीआयसीआय बँकेतील विमा विभागात नोकरीला होते. रविवारच्या सुटीमुळे ते मित्र समेश पराग गुळवे (भूषण कॉलनी), अलाफ राजेंद्र कुलकर्णी (मुंदडानगर) व विजय ठाकूर (पाटील) याच्यासोबत त्याच परीसरातील कोल्हे हिल्स टेकडीवर कार (क्र.एमएच 19 बीजे 898) ने गेले. त्याठिकाणी तास दीड तास थांबले. ते सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कारने टेकडीवरुन घराकडे निघाले.

या अपघातामधील कार ही अलाफ कुलकर्णी यांची असून भुपेंद्र पाटील चालवित होते. कारने टेकडीच्या खाली उतरत असताना समोरुन येणार्‍या भरधाव वेगातील दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भुपेंद्र पाटील याचा कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट रोडच्या खाली उतरल्याने तीन वेळा कलंडली.

यात भुपेंद्र पाटील जागीच ठार झाले. त्यांच्या सोबतच्या तिघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, प्रथमोपचारानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

मृत भुपेंद्र पाटील हे रोटवद (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी होते. त्यांचे वडील संतोष पाटील हे रुस्तमजी इंग्लिश मीडियम शाळेत सिक्युरिटीत नोकरीला आहे. तर मोठा भाऊ दीपक पाटील हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांच्या पश्चात आई उषाबाई, वडील संतोष पाटील, मोठा भाऊ दीपक पाटील, पत्नी सपना, आणि धनश्री आणि भाग्यश्री या दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. शिवजयंती उत्सव जवळ येत असल्याने या उत्सवाच्या तयारीत ते होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या