खान्देशात आज कानबाईचा लोकोत्सव

0
प्रा.बी.एन.चौधरी,धरणगाव । दि.29-खान्देशातील लोकोत्सवात कानबाई पुजनाला खूप महत्व आहे. श्रावण महिना तसा सण-उत्सवाचा महिना. श्रावणातल्या नागपंचमीनंतर येणार्‍या शनिवारी कानबाईचा या रोटांना प्रारंभ होतो.
गावागावात कानबाई च्या स्वागताची तयारी सुरु होते. महिला गाणी म्हणतात.
आज कानबाईना येवा,
पाच शेरना रोट करु.
डिकरा खोकरा जेवाडू,
गोमतिरे घर सजाडू.
कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे.

खान्देश म्हणजे कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं अशी धारणा आहे.

या उत्सवाच्या आधी घरात रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात.
पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु, चण्याची दाळ घेतात.

लहान रोट
शनिवारी म्हणजे आदल्या दिवशी इतर सात धान्य घेतात. त्यांच्या भाकरी म्हणजे रोट करतात. त्या सोबत किल्लूची भाजी खातात. ही कृषी संस्कृतीची पूजा मानली जाते.

मोठे रोट
रविवारी मोठे रोट पुजले जातात. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळघालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो.

कानबाई स्थापना
कानबाई म्हणून नारळाची स्थापना करतात. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असत…. नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते.

कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते.
मग आरती, नैवेद्य दाखवतात.

नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण फक्त पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात.

इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात.

मग ते रोट कामठयांच्या टोपलीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते.

मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्यया चौरंगावर बसवून पूजा केली जाते. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

 

LEAVE A REPLY

*