सहकार खात्याने मागविली थकीत, येणे कर्जाची माहिती

0
जळगाव । दि. 16 । प्रतिनिधी – राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी सहकार खात्याकडुन येणे पिक आणि शेती मध्यम मुदत थकीत कर्जाची माहिती उद्या दि. 17 जूनपर्यंत मागविली आहे.
दरम्यान तातडीचे 10 हजार रूपये देण्याबाबत जिल्हा बँकेप्रमाणे इतर बँकांनाही सुचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी सांगितले.
राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी निकषांवर आधारीत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु राज्यात नेमके किती कर्ज थकित स्वरूपात आहे ? याची माहीतीच उपलब्ध नाही.
त्यामुळे सहकार खात्यामार्फत अशा थकीत आणि येणे कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे. यात 31 मार्च 2016 अखेरीस येणे असलेले पीक कर्ज व शेती मध्यम मुदत कर्ज, 31 मार्च 2016 अखेरीस थकीत कर्ज, 30 जून 2016 अखेर येणे व थकीत कर्ज, आणि 31 मार्च 2017 अखेरीस येणे आणि थकीत असलेल्या कर्जाची माहीती प्रपत्रानुसार मागविण्यात आली आहे.

ही माहीती उद्या दि. 17 जूनपर्यंत द्यावयाची असल्याने आज रात्री उशिरापर्यंत कर्जाची माहिती मागविण्यासाठी उपनिबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालय सुरू होते.

कर्जमाफीपुर्वी राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने 10 हजार रूपये देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र हे 10 हजार रूपयेही देण्यात असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे इतर बँकांनी ही रक्कम शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावी अशा सुचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी अद्याप त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच जे 10 हजार रूपये मंजूर झाले आहे ते देखिल शेतकर्‍यांना मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जुन्या नोटांचा निर्णय अधांतरीच
जिल्हा बँकेकडे 500 आणि 1000 रूपयांच्या 250 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. या नोटांबाबत अद्याप शासनाकडून कुठलाही निर्णय न झाल्याने जिल्हा बँकेचे नुकसान होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शासनाकडून जिल्हा बँकेला अर्थसहाय्य मिळाल्यास शेतकर्‍यांना कर्जपुरवठा केला जाईल असेही सुत्रांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*