वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा जामनेर तालुका पिछाडीवर

0
जळगाव । दि.2 ।-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेनुसार ‘स्वच्छ भारता’कडे वाटचाल करण्यासाठी, आरोग्याचे उद्भवणारे गंभीर आजार टाळण्यासाठी आणि प्रत्येक गाव दुर्गंधीमुक्त करुन पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जि.प.प्रशासनाने त्रुटी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 26 हजार 671 वैयक्तिक शौचालयाच्या उद्दीष्टांपैकी 2 लाख 89 हजार 549 बांधकाम पूर्ण झाले असून 37 हजार 122 शौचालयाचे काम अपूर्ण आहे. अर्थात 100 टक्क्यापैकी 59.2 टक्के काम झाले असून 40.98 टक्के काम अपूर्ण आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांच्या जामनेर तालुक्यात केवळ 42.41 टक्के काम झाले असून ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेत पिछाडीवर असल्याचे जि.प.प्रशासनाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

उघड्यावर शौचास जात असल्याने पर्यावरणाचा र्‍हास होवून अनेक साथीचे आजार उद्भवतात. गंभीर आजारांचा सामाना करावा लागतो.

कुटूंबातील प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहावे, अस्वच्छतेमुळे आरोग्यावर करावा लागणारा अनावश्यक खर्च टाळता यावा, गाव दुर्गंधीमुक्त करुन पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आणि स्वच्छ भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ऑक्टोंबर 2014 पासून ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण, शहरी) योजना राबविण्यात येतात.

या योजनेंतर्गत ज्या कुटूंबियांकडे शौचालय नाहीत. अशा कुटूंबियांना शौचालय बांधकामासाठी 12 हजाराचे आर्थिक प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

यात केंद्र शासनातर्फे 75 टक्के तर राज्य शासनातर्फे 25 टक्के अनुदानाचा समावेश आहे. या योजनेचे अंमलबजावणी करुन जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त करण्याकडे प्रशासनाची वाटचाल सुरु आहे.

सन 2012 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार 600 कुटूंबियांपैकी 3 लाख 26 हजार 671 कुटुंबियांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे 2014 पासून ते आसतागायत 2 लाख 89 हजार 549 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम झाले असून 37 हजार 122 शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहेे.

जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्यशासनाने मार्च 2018 पर्यंत मुदत दिली असून आठ महिन्याच्या कालावधीत 40.98 टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हाण जि.प.प्रशासनासमोर ठाकले आहे.

जनजागृतीवर लाखो रुपये खर्च
स्वच्छते संदर्भात जि.प.प्रशासनातर्फे लाखो रुपये खर्च करुन जनजागृती केली जात आहे. तसेच स्वच्छतादुत आणि गुडमॉर्निंग पथकाद्वारे देखील स्वच्छतेबाबत संवाद साधला जातो. गेल्या चार वर्षात आतापर्यंत 2 कोटी 53 लाख 67 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु जनजागृती प्रभावीपणे केली जाते का? असा सवाल देखील उपस्थित होता.

पाणी टंचाईमुळे वापर कमी
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयाचा वापर कमी होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’ योजने पाठोपाठ पेयजल योजना देखील राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात 3 हजार 297 सार्वजनिक शौचालय
जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 297 सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यात भुसावळ तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 76 सार्वजनिक शौचालय असून पाचोरा व पारोळा तालुक्यात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याचे जि.प.प्रशासनाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

भुसावळ तालुका 100 टक्के हगणदारीमुक्त
जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी भुसावळ तालुका 100 टक्के हगणदारीमुक्त असल्याचा दावा जि.प.प्रशासनाने केला आहे. त्या पाठोपाठ बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे.

जामनेर तालुक्यात 58 टक्के काम अपूर्ण
वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन हे आरोग्यदुत म्हणून जिल्ह्यासह राज्यात परिचीत आहेत. मात्र त्यांच्याच जामनेर तालुक्यात 37 हजार 144 वैयक्तिक शौचालयाच्या उद्दिष्टांपैकी केवळ 20 हजार 364 वैयक्तिक शौचालय तर 35 सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झाले आहे. 100 टक्क्यापैकी केवळ 42.41 टक्के पूर्ण झाली असून 57.59 टक्के काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जामनेर तालुका पिछाडीवर असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*