Type to search

जळगाव राजकीय

जामनेरात पुन्हा ‘महाजन’च दमदार

Share

दोनवेळा ईश्वरलाल जैन, संजय गरुड तर पाचव्यांदा डी.कें.चा पराभव करीत सहाव्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांचा जामनेर मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे. 1995 पासून विरोधकांना धोबीपछाड देत महाजनांनी आपला गड मजबूत केला. आता तर ते राज्यातील हेविवेट मंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा अभेद्य किल्ला भेदण्यासाठी विरोधक कामाला लागले असले तरी त्यात त्यांना कितपत यश येते, हे निकालानंतर समोर येणारच आहे.

1995 व 99 मध्ये राष्ट्रवादीच्या ईश्वरलाल जैन यांचा तर 2004 व 2009 मध्ये काँग्रेसच्या संजय गरुडांचा पराभव करणार्‍या महाजनांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या डी.के. पाटलांना धूळ चारत आपला विजय साजरा केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्याने व महाजनांचे अनेक प्रखर विरोधक सध्या भाजपाच्या आश्रयाला आलेले असल्याने महाजन तर दूरच त्यांचे समर्थकच निवडणुकीतील विजयाबाबत लाखोंची पैज लावण्याच्या तयारीत आहेत.

मतदारसंघाची स्थिती
जामनेर मतदारसंघाची रचना बघता संपूर्ण जामनेर तालुका व पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड सर्कलचा यात समावेश होतो. जातीनिहाय मतदारांचा विचार केल्यास मराठा समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. त्या खालोखाल बंजारा समाज या मतदारसंघात असला तरी मुस्लीम व मागासवर्गीय मतदार निकालावर परिणाम करू शकतात. महाजन ज्या गुजर समाजातून आहे, त्यांचे मतदान टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास 0.2 टक्केदेखील नाही. मात्र, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते पाचवेळा विजयी झालेले असून आता सहाव्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

विकासकामांचा धडाका
गिरीश महाजन 1995 पासून आमदार असले तरी 2014 पर्यंत 1995 चा अपवाद वगळता ते विरोधी पक्षातच होते. त्यामुळे मतदारसंघात पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. 2014 मध्ये भाजपाचे सरकार येताच त्यात महाजनांना जलसंपदासारखे महत्त्वाचे खाते मिळाले. त्यातच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी असल्याने थोड्याच दिवसात त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचादेखील कारभार आला. त्याचा पुरेपूर उपयोग करुन घेत गिरीश महाजनांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु केला. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी आपला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

कोरडवाहू शेती मोठे आव्हान
जामनेर मतदारसंघात शेतीचा विचार केला असता बागायती क्षेत्र बोटावर मोजण्याएवढेच आहे. जलसंपदामंत्री असले तरी सिंचनच्या पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत. छोटे-मोठे प्रकल्प यावर्षी ओव्हर फ्लो असले तरी ते पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी असेलेले लिफ्ट एरिगेशनचे काम अद्यापही मार्गी लागलेले नाही. त्यामुळे आजही कोरडवाहू शेतीचे आव्हान महाजनांसमोर आहे. असे असले तरी जनसंपर्क व आरोग्य सेवेच्या माध्यमातून गावोगावी त्यांनी पेरलेले जाळे मतदारसंघात नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या तर मुख्यमंत्र्यांचे ‘हनुमान’ म्हणूनच मतदारसंघात परिचित आहेत.

एकूण मतदार : 3 लाख 8 हजार 468
पुरुष – 1 लाख 60 हजार 615
महिला – 1 लाख 47 हजार 849
टक्केवारीनुसार : मराठा-70, बंजारा 10
मुस्लीम-05, दलित-10, माळी व अन्य 05
2014 मध्ये डी. के. पाटलांंनी

दिली होती लढत
दोनवेळा ईश्वरलाल जैन व दोनवेळा संजय गरुडांचा पराभव झाल्याने 2014 मध्ये तोंडापूरच्या डिगंबर केशव पाटील (डी.के.पाटील) यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परंतु महाजनांचा बालेकिल्ला व त्यातच मोदी लाट यामुळे डी.के.पाटलांचा टिकाव लागू शकला नाही. गिरीश महाजन यांना 103498 तर डी.के.पाटलांना 67730 मते मिळाली होती. त्यामुळे डी.के.पाटील यांचा तब्बल 35 हजार 768 मतांनी पराभव झाला होता.

गरुड पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
दोनवेळा पराभव झालेला असला तरी 2019 मध्ये संजय गरुड पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असून त्यांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधीत्व करुनही गिरीश महाजन यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ते मतदारसंघात फिरत आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने ते केवळ अर्ज दाखल करण्यासाठी जामनेरात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याने गिरीश महाजनांच्या समर्थकांनी प्रचाराला प्रारंभ केलेला असून गावोगावी त्यांचे संपर्क अभियान सुरु झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!