धगधगते काश्मीर… जणू अश्वत्थाम्याचीच जखम…

0
जुनच्या दुसर्‍या आठवड्यात परिवारासह जम्मू- काश्मिरच्या दौर्‍यावर जाणाचा योग आला. जम्मूला गेल्यानंतर कटरा येथे माता वैष्णो देवीचे दर्शन घेवून आम्ही श्रीनगरच्या दिशेने रवाना झालो.
निसर्गरम्य वातावरणाने मन प्रसन्न करणार्‍या सौंदर्याचा आनंद घेत माझ्या परिवारासह विजय घोरपडे, किशोर तांबट,प्रफुल्ल ताम्हणकर यांचा परिवार दि.14 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास श्रीनगर येथे पोहचलो.
पहिल्या दिवशी येथील प्रसिध्द दल सरोवराची सैर करुन आम्ही दुसर्‍या दिवसाच्या तयारीला लागलो. श्रीनगर पासून 80 किलोमिटरवर असलेल्या सोनबर्ग येथे पोहचल्यानंतर तेथील निसर्गनिर्मित बर्फाचा मनसोक्त आनंद लुटला.
त्यानंतर पुन्हा श्रीनगरला मुक्कामाला आलो. सकाळी उठून गुलमर्गला जाण्याचा आमचा कार्यक्रम होता. मात्र त्याच रात्री पहेलगाम येथे भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ला झाला यात चार जवान शहिद झाले.

तर उत्तरादाखल भारतीय सैन्याने कारवाई करीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. त्याचवेळी या अतिरेक्यांना मदत करणार्‍या दोन स्थानिक तरुणांना देखील यमसदनी पाठविले, हेच निमित्त झाले.

रवींद्र पाटील

आमच्या स्थानिक नागरिकांना भारतीय सैन्याने मारले असे म्हणत श्रीनगर मधील माथेफिरु रस्यावर आले. त्यामुळे दोन दिवस शहरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली.

त्यामुळे पहिल्या दिवशी शांत वाटणारे श्रीनगर दुसर्‍या दिवशी वेगळेच वाटायला लागले. अर्थात श्रीनगरच्या काही भागातच हे वातावरण होते.

मात्र शहरात सर्वत्र भारतीय जवान व त्यांच्या मदतीला केंद्रीय राखीव दलाचे जवान (सीआरपीएफ) जागोजागी तैनात होते. त्यातच 18 जूनला भारत- पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना असल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले.

येथे भारत माता की जय म्हणणे म्हणजे मोठा गुन्हा ठरतो. पाकसमर्थकांची संख्या जास्त असल्याने भारताची विकेट पडल्याबरोबर जल्लोष साजरा होतो आणि 18 तारखेचा सामना तर पाकने जिंकला होता.

त्यामुळे अनेक भागात संचारबंदी असतांनाही पाकच्या समर्थनार्थ अनेक तरुण रस्त्यावर आले. फटाके फोडले गेले, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

त्यावेळी खर्‍या काश्मिरचे रुप समोर आले. अर्थातच भारत समर्थक काश्मिरींना दु:ख झाले तरी त्यांना ते व्यक्त करण्याचा अधिकार मात्र नाही हे लक्षात आले.

त्यामुळेच की काय येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या नागरिकांना देखील दबावातच रहावे लागते यात शंका नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा खेळ डोळ्यासमोर पहातांना वेगळाच अनुभव आला. याविषयी एक दोन स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यांचा भारतीय जवानांवरील राग दिसून आला. आधी आमच्या स्थानिक नागरिकांना धक्का लावण्याची हिंमत जवानांची होत नव्हती.

‘मगर जबसे मोदी सरकार आयी वो तो हमारे बंदो को बिना वजह ठोक देते है’ असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. आणि म्हणूनच आम्ही जवानांच्या गाड्या दिसल्या म्हणजे त्यांच्यावर दगडफेक करतो असे त्यांचे म्हणणे होते.

याचाच अर्थ आधी काश्मिरमध्ये जवानांना स्थानिक नागरिकांनी काहीही केले तरी त्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती.

मात्र आता केंद्र सरकारने सैन्य दल, सीआरपीएफ, एसआरपी, बीएसएफच्या सार्‍या अधिकार्‍यांना अतिरेक्यांच्या निपटार्‍यासाठी वाटेल ते करण्याच्या अर्थात वेळप्रसंगी गोळ्या चालविण्याच्या देखील सुचना दिलेल्या असल्याने पाकसमर्थक स्थानिकांचे पित्त खवळले आहे. त्यातूनच जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याचे प्रकार घडत आहे.

दुसरीकडे येथीलच काही स्थानिकांचे मात्र भारताच्या बाजूने चांगले मत आहे हे देखील महत्वाचे आहे. एकाने तर बोलतांना सांगितले की ये तो बहोत पहले हो जाना चाहीए था जो अब मिलट्रीको अधिकार दिया है.

अगर अगले पाच साल मोदी केंद्र मे सरकारमे रहे तो काश्मिरकी हमेशा के लिए समस्या खतम हो जायेगी. त्याचा हा विश्वास महत्वाचा असला तरी काश्मिरची समस्या एवढ्या सहजासहजी सुटणार नाही हे मात्र नक्की.

मात्र स्थानिक नागरिक व सैन्यदलात दररोज होत असलेल्या चकमकीत अनेक जवांनाना त्याचा त्रास होत असल्याने यावर तरी तात्काळ उपाययाजेना करण्याच्या तयारीत आता आपले सैन्यदल लागले आहे हे मात्र नक्की.

भारताचा स्वर्ग म्हणून समजल्या जाणार्‍या काश्मिरला सध्या ज्या अतिरेकी समस्यांनी घेरले आहे. त्याचा परिणाम येथील पर्यटनावर देखील झाला आहे.

अर्थातच स्थानिकांच्या हाताला काम नसल्याने पाकसमर्थक विघटनवादी याच तरुणांना हाताशी धरुन हजार- पाचशे रुपये रोज देवून भारतीय सैन्यावर दगडफेक करायला लावातात हे कटु सत्य समोर आल्याने आता सरकारने या विघटवाद्यांनाच नजरकैदेत ठेवण्याचा सपाटा लावला आहे.

खरे तर भारताची फाळणी होतांनाच हा प्रश्न निकाली निघाला असता तर आज भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या काश्मिरची समस्या अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेसारखी कायम राहिली नसती, हे मात्र नक्की.

दररोजच्या बातम्यांमध्ये काश्मिरचा उल्लेख नसेल असे होत नाही. कधी अतिरेक्यांच्या हल्यात जवान शहिद तर, कधी जवानांवर स्थानिकांकडून होणारी दगडफेक हा नित्याचा विषय झालेला असला तरी त्याला भारतीय जवान दररोज सामोरे जात आहेत.

त्यातच एखाद्या ठिकाणी भारतीय जवानांनी अतिरेरक्यांना मदत करणार्‍या स्थानिक तरुणांना टार्गेट केले तर त्याचा लगेच उलट परिणाम होत येथील लोक जवानानांच धारेवर धरतात.

त्यातच आपले राजकारणी मतांच्या जोगव्यासाठी जवानांची बाजू न घेता त्यांनाच दोष देण्यात धन्यता मानतात. नुकताच जम्मू- काश्मिर दौरा करण्याचा योग आला. यावेळी काही ठिकाणी भारतीय जवानांशी संवाद साधण्याचा योग आला.

यावेळी सैन्यावर होणार्‍या सततच्या दगडफेकीबद्दल विचारले असता त्यांनी दिलेले कारण ऐकूण आताच्या धगधगत्या काश्मिरचे खरे कारण समोर आले.

तीन वर्षापुर्वी सत्ता बदल झाल्यानंतर जम्मू खोर्‍यात आनंद तर काश्मिर खोर्‍यात ‘मातम’पाळण्यात आला. येथील जनता भारतापेक्षा पाकिस्तानलाच जास्त मानत असल्याने तिरंगा फडकवितांना देखील चार वेळा विचार करावा लागतो अशी स्थिती आहे.

त्यामुळे अतिरेक्यांचे तर काश्मिर खोरे माहेरघर होते. त्यातच स्थानिकांच्या सहकार्याने त्यांना काम करणे सोपे होते. त्यातच आधीच्या सरकारने स्थानिकांना कोणताही धक्का लावू नका असे आदेशच सैन्याला दिलेले असल्याने जवानांचे हात बांधले होते.

त्यामुळे अतिरेकी बिनधास्त मोकळे फिरायचे मात्र मोदी सरकार येताच अतिरेकी कारवायांबाबत कडक धोरण अवलंबले गेले.

अतिरेक्यांना सहकार्य करणारा मग तो स्थानिक असला तरी त्याला सोडयचे नाही, वेळप्रसंगी गोळी चालवावी लागली तरी हरकत नाही, असे आदेशच जवानांना देण्यात आल्याने जवानांनी अतिरेकर्‍यांचा बंदोबस्त करायला प्रारंभ केला.

त्यातच स्थानिक नागरिकांचा सहभाग असल्यास त्याला आधी समजावून व न ऐकल्यास वेळप्रसंगी गोळी चालवून ठिकाणावर आणण्याचा सपाटा लावला आहे.

त्यामुळे बिथरलेल्या पाक समर्थकांनी स्थानिकांचा मुद्दा पुढे करीत जवानांवर दगडफेकीचे प्रकार सुरु केले आहेत. अर्थात जवानांना दिलेले मोकळे अधिकार हाच त्यांचा मुळ मुद्दा आहे. आणि यामुळे त्यांना उघडपणे अतिरेर्‍यांना आपल्या घरात ठेवता येत नसल्याने हा सारा खटाटोप सुरु आहे.

अर्थात त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असली तरी उप्रद्रवमुल्य मात्र समोर येत आहे. पाकसमर्थक सोडले तर अन्य स्थानिक नागरिक मात्र आम्ही भारताचेच नागरिक असल्याचे सांगत असले तरी सारेच त्याचे उघड समर्थन करीत नाहीत.

त्यामुळे आजही काश्मिर समस्या म्हणजे अश्वत्थाम्याची भळभळती जखमच असल्याचे यातून स्पष्ट होते.

 

 

LEAVE A REPLY

*